संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. १८० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि त्यातील ‘घुमर’ या गाण्याला प्रेक्षकांचा ओसंडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट यशस्वी ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हाच आनंद साजरा करण्यासाठी शनिवारी रात्री अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या घरी दिमाखदार पार्टीचे आयोजन केले. एकीकडे रणवीर सिंग आणि दीपिका यांच्या ब्रेकअपची बातमी ताजी असतानाच या पार्टीमध्ये सर्वांत आधी हजेरी लावली ती रणवीरनेच.
या चित्रपटात दीपिका राणी पद्मिनी, शाहिद कपूर महारावल रतन सिंह आणि रणवीर अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या तिन्ही भूमिकांचा फर्स्ट लूक असो किंवा चित्रपटाचा ट्रेलर किंवा दीपिकावर चित्रीत करण्यात आलेले ‘घुमर’ हे गाणे असो, प्रत्येक गोष्टीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘घुमर’ हे गाणे प्रेक्षकांना फार आवडले असून अल्पावधीत या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले. प्रदर्शनापूर्वीचे हे यश साजरा करण्याजोगे असून दीपिकाने इंडस्ट्रीतील अनेक मित्रमैत्रिणींना आमंत्रित करून पार्टीचे आयोजन केले.
‘पद्मावती’च्या थ्रीडी ट्रेलर प्रदर्शनानंतर रणवीरने काही ट्विट्स केले, ज्यावरून दीपिका आणि त्याच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होऊ लागलेली. मात्र, दीपिकाच्या पार्टीला सर्वांत आधी पोहोचून बॉलिवूडच्या ‘बाजीराव’ने दीपिकासोबतचे त्याचे नाते मजबूत असल्याचे दाखवून दिले.
रणवीरसोबतच शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, करण जोहरसुद्धा या पार्टीला उपस्थित होते. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा, सारा अली खान, जान्हवी कपूर, पुनीत मल्होत्रा, इशान खत्तर यांनाही पार्टीमध्ये पाहिले गेले.