बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पदुकोण. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या जोडप्याबद्दलच्या लहानसहान गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच गेल्या काही दिवसांपासून दीपिका गरोदर असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. या चर्चांवर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने मौन सोडलं आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नंसीच्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं. त्याचसोबत त्यावर तिचं मतदेखील मांडलं. ”प्रेग्नंसीच्या अफवा ऐकून आम्ही अजिबात हैराण झालो नव्हतो. कारण चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्याची खूप इच्छा असते. आम्हालाही मुलं हवी आहेत आणि आम्ही मुलांवर प्रेमसुद्धा करतो. पण सध्या तरी पालक होण्यासाठी आम्ही दोघंही तयार नाही आहोत. सध्या आमचं संपूर्ण लक्ष करिअरवर असल्याने पालकत्व इतक्यात स्वीकारता येणार नाही,” असं दीपिका म्हणाली.

आणखी वाचा : ‘झी मराठी अवॉर्ड्स २०१९’मध्ये ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेने मारली बाजी

बॉलिवूडमधील हे ऑफस्क्रीन कपल लवकरच ऑनस्क्रीनसुद्धा एकत्र झळकणार आहे. ’83’ या चित्रपटात दीपिका रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत आहे. १९८३ मध्ये भारताने क्रिकेट विश्वात मिळवलेल्या विजयावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. यामध्ये रणवीर माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.