बॉलिवूड आणि क्रिकेट विश्व यांच्यातील नाते काही नवीन नाही. अनेक क्रिकेटपटूंचे बी टाऊनशी असलेले घनिष्ठ नातेही नेहमीच चर्चेत असते. भारत आणि भारताबाहेरील क्रिकेट खेळाडू चित्रपट सृष्टीत या ना त्या कारणावरुन सक्रिय असतात. ‘आयपीएल’ मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट खेळाडूही बॉलिवूडमध्ये शिरकाव करत आहेत. त्यातच आता वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर खेळाडू ड्वेन ब्रावोची भर पडली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘तुम बिन’ या गाण्यासाठी आपला आवाज दिल्यानंतर ड्वेन ब्रावोने दीपिका पदुकोनसाठीचे त्याचे प्रेम व्यक्त केले आहे.
दीपिकाबद्दल बोलताना, ‘दीपिका माझी आवडती अभिनेत्री आहे. मी तिला युवराज सिंगच्या फॅशन ब्रॅँडच्या उद्घाटन सोहळ्यावेळी भेटलो होतो. तिचे सौंदर्य पाहताच मी भारावून गेलो’, असे ब्रावो म्हणाला. दीपिकासह एका चित्रपटात रोमान्स करण्याची संधी मिळाली तर…? असे विचारले असता ‘रोमान्सचे ठाऊक नाही, पण मला तिच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल’ असेही ब्रावो म्हणाला.
दीपिकाबद्दल बोलत असतानाच ड्वेन ब्रावोने हिंदी भाषा शिकण्याच्या त्याच्या अनुभवाबद्दलही सांगितले. हिंदी भाषा शिकणं थोडं अवघड असलं तरीही गाणं गाण्याच्या संपूर्ण अनुभवाचा त्याने आनंद घेतल्याचेही ब्रावोने सांगितले. विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय असणाऱ्या ब्रावोने क्रिकेटला नेहमीच आपले प्रथम प्राधान्य असणार आहे असेही स्पष्ट केले.
दरम्यान, युवराज सिंगच्या फॅशन ब्रॅँड लाँचच्या वेळी या सोहळ्याला अनेक कलाकारांसह क्रिकेट खेळाडूंनीही हजेरी लावली होती. मैदानावर आणि मैदानाबाहेरही युवराज सिंग त्याच्या हटके अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असतो. क्रिकेट प्रमाणेच तो फॅशन आणि चित्रपटवर्तुळातही तितक्याच सहजतेनं वावरतो. हीच सहजता आणि कॅन्सरग्रस्तांपोटी असणारी सहानुभूति यांचा मेळ साधत युवराजने त्याचा फॅशन ब्रँड लाँच केला आहे. ‘युवीकॅन फॅशन’च्या (YWC Fashion) एका दिमाखदार सोहळ्यासाठी नुकतेच एका कार्यक्रमामध्ये रॅम्पवर कलाकारांची मांदीयाळी पाहायला मिळाली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2016 रोजी प्रकाशित
ड्वेन ब्रावो झाला दीपिकाचा दिवाना..
क्रिकेटला नेहमीच आपले प्रथम प्राधान्य असणार आहे असेही ब्रावोने स्पष्ट केले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 11-09-2016 at 15:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone is my favourite dwayne bravo