यावर्षीच्या ‘टीन चॉईस अवॉर्ड’साठी अभिनेत्री दीपिका पदुकोणला नामांकन मिळाले आहे. या पुरस्काराचे नामांकन नुकतेच जाहीर झाले असून दीपिकाला यामध्ये अॅक्शन चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले आहे. दीपिकाचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज’मधील तिच्या भूमिकेसाठी हे नामांकन मिळाले आहे. इतकेच नव्हे तर सुप्रसिद्ध ‘वंडर वूमन’ गल गडॉटशी दीपिकाची पुरस्कारासाठी स्पर्धा आहे. कारण ‘वंडर वूमन’ चित्रपटासाठी गल गडॉटलाही नामांकन मिळाले आहे.

‘वंडर वुमन’ या बहुचर्चित सिनेमामध्ये भूमिका साकारलेली इस्राईलची अभिनेत्री गल गडॉटने काही काळातच भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. सिनेमात चित्तथरारक असे स्टंट्स करून प्रेक्षकांना आश्यर्यचकित करणाऱ्या गल गडॉटचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे गल गडॉटसोबत दीपिकाची या पुरस्कारासाठी स्पर्धा असल्याने सर्वांचे लक्ष या पुरस्काराकडे आहे.

वाचा : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या T20 लीगमध्ये शाहरूखने विकत घेतला संघ

अॅक्शन चित्रपटातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांच्या या श्रेणीमध्ये ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबिअन’साठी काया स्कॉडलेरिओ, मायकल रॉड्रीगेजची ‘द फेट ऑफ द फ्युरिअस’साठी, तर नीना डोब्रेव आणि रुबी रोझ यांची ‘ट्रीपल एक्स’ चित्रपटासाठी निवड झाली आहे.

वाचा : मी कोणासाठीच स्वतःला बदलणार नाही- प्रियांका

हॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केल्यानंतर लगेच पुरस्कारासाठी दीपिकाची निवड झाल्याने सर्व स्तरांतून तिची स्तुती केली जातेय. दीपिका आणखी एका हॉलिवूड चित्रपटात काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. दीपिकाप्रमाणेच प्रियांका चोप्राने ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटात भूमिका साकारली. मात्र प्रियाकांला कोणत्याच पुरस्काराचे नामांकन मिळू शकले नाही. ‘द टीन चॉईस अवॉर्ड’ या सोहळ्याचे प्रसारण १३ ऑगस्ट रोजी फॉक्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.