अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट करणी सेनेच्या तीव्र विरोध आणि अनेक अडचणींनंतर अखेर प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफीसवर संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटाची दणक्यात कमाईसुद्धा सुरु आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वी दीपिकाला करणी सेनेकडून जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. या सर्व परिस्थितीला आपण कसे सामोरे गेलो हे सांगतानाच दीपिकाने तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंग सांगितला. वयाच्या १४व्या वर्षी तिचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला कशाप्रकारे धडा शिकवला, हे दीपिकाने सांगितले.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘मी त्यावेळी १४ वर्षांची होती. कुटुंबियांसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. जेवण झाल्यावर माझी बहिण आणि वडील पुढे निघाले आणि मी आईसोबत मागे होती. इतक्यात एका व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. आधी मी त्याकडे दुर्लक्ष केले आणि काहीच घडले नसल्यासारखे दाखवले. मागे वळून मी त्या व्यक्तीचा पाठलाग गेला. भररस्त्यात कॉलर पकडून त्याच्या कानशिलात लगावले. तेव्हापासून माझ्या आईवडिलांना विश्वास बसला की मी धाडसाने कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकते.’
राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाचे नाक कापणाऱ्याला बक्षिस देण्याचे क्षत्रिय महासभेने जाहीर केले होते. या तीव्र विरोधालाही न जुमानता ती धाडसाने परिस्थितीला सामोरे गेली. आमचे कामच त्यांना योग्य उत्तर असेल, असे बेधडक उत्तर तिने विरोधकांना दिले होते.