अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणने मानसिक स्वास्थ्य व नैराश्याबाबत पोस्ट लिहिली होती. एका पोस्टमध्ये तिने माध्यमांनाही फटकारलं होतं. त्यानंतर आता सुशांतच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या पापाराझीला तिने सवाल केला आहे. बॉलिवूड पापाराझीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुशांतच्या पार्थिवाला रुग्णालयातून स्मशानभूमीकडे नेतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये दीपिकाने त्याला प्रश्न विचारला.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पापाराझीने लिहिलं होतं, ‘माझ्या लिखित परवानगीशिवाय कोणीही मी काढलेले फोटो किंवा व्हिडीओ दुसरीकडे वापरू शकत नाही.’ यावर दीपिकाने कमेंटमध्ये त्याला प्रश्न विचारला, ‘बरोबर. पण त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या लिखित परवानगीशिवाय तुम्ही हे व्हिडीओ शूट करून पोस्ट करणं आणि त्यातून पैसे कमावणं योग्य आहे का?’ पोस्टवरील त्यापुढील कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी दीपिकाचं कौतुक केलं. ‘तू बरोबर बोललीस’ असं म्हणत अनेकांनी तिला पाठिंबा दिला.

याआधी तिने सोशल मीडियावर लिहिलं होतं, ‘माध्यमांतील माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, गुन्हेगार गुन्हा करतात. लोक आत्महत्या करत नाहीत तर ते आत्महत्येने मरतात. अत्यंत गंभीर क्लेशातून ही कृती घडते.’ त्याचसोबत तिने मानसिक आरोग्याचं महत्त्व अधोरेखित करत एक ट्विट केलं होतं. ‘तुम्ही बोला, व्यक्त व्हा, मदत मागा, संवाद साधा. तुम्ही एकटे नाही आहात. आपण सर्वजण या प्रवासात एकमेकांसोबत आहोत आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे उमेद आहे’, असं ती म्हणाली होती.