बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण Deepika Padukone सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. दीपिका नेहमीच तिच्या अदांनी आणि लूकने सर्वांना घायाळ करत असते. मात्र, यावेळच्या तिच्या फोटोशूटवर नेटिझन्सकडून टीका केली जात आहे. दीपिकाने एका मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केले होते. त्यातील काही फोटो तिने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवरही शेअर केले होते. त्यानंतर हे फोटो व्हायरल होताच नेटिझन्सनी घाणेरड्या शब्दांमध्ये दीपिकावर टीका करण्यास सुरुवात केली.
दीपिकाने पांढऱ्या रंगाच्या टू पीस कपड्यांमधील फोटो शेअर केले होते. त्या फोटोंना अभिनेता रणवीर सिंगनेदेखील सोशल मीडियावर लाइक केलेले. फोटो शेअर करताना दीपिकाने लिहिलेले की, ‘Just posted a photo’. तिने फोटो शेअर करताच अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये युजर्सनी टीका करण्यास सुरुवात केली. तिचा रंग आणि शरीरयष्टी यावर निशाणा साधत विविध कमेन्ट्स तिच्या फोटोंना येऊ लागल्या. दीपिका तुला लाज वाटायला हवी, अशा शब्दांमध्ये युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर एका युजरने लिहिलंय की, सोशल मीडियावर कसे फोटो शेअर करायला हवेत हे दीपिकाला माहित नाही वाटतं.
वाचा : अरे, हाच का तो ‘बाहुबली’मधला प्रभास!
आतापर्यंत केलेल्या शूटपैकी दीपिकाचे हे सर्वाधिक बोल्ड फोटोशूट आहे. हे फोटोशूट करणारी शलीना नथानी म्हणाली की, आम्हाला दीपिकाला एका वेगळ्या आणि बोल्ड अंदाजात सर्वांसमोर आणायचे होते. दीपिकाला या ड्रेस, मेकअप आणि स्टायलमध्ये अजिबात अवघडल्यासारखे वाटत नव्हते. तिचे हे फोटोशूट एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी करण्यात आले आहे.
वाचा : गायक-संगीतकार हिमेश रेशमियाचा घटस्फोट
अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या कपड्यांवरून निशाणा केले जाते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रावरही तिच्या कपड्यांवरून टीका करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेताना प्रियांकाने जो ड्रेस घातला होता त्यावरून युजर्सनी तिला सुनावले होते. पण, प्रियांकाने नंतर नीडरपणे सर्वांच्या टीकांना चोख उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्याप्रमाणे आता दीपिका तिच्यावर टीका करणाऱ्यांना कशाप्रकारे उत्तर देते हे पाहावे लागेल.