दाक्षिणात्य संस्कृतीची झलक असलेला रोहित शेट्टीचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला. विशेष म्हणजे यातल्या लुंगी डान्सने अनेकांनाच भुरळ घातली. हा आगळावेगळा लुंगी डान्स बॉलिवूडसोबतच हॉलिवूडलाही भावला. विशेष म्हणजे आगामी हॉलिवूड चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण चक्क लुंगी डान्स करताना पाहायला मिळणार आहे.
‘ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ जेंडर केज’चा दिग्दर्शक डी.जे. कारुसोने यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘ट्रिपल एक्स’च्या आगामी सीरिजमध्ये दीपिका झळकणार असल्याचं कारूसोनं गेल्यावर्षीच जाहीर केलं होतं. या सीरिजमध्ये ती लुंगी डान्स करताना दिसणार आहे. यासंदर्भात कारूसोने ट्विटदेखील केलं आहे.
I want to end xxx4 with and Bollywood dance song. Led of course by @deepikapadukone. Lungi Dance?? Something new?
— D.j. Caruso (@Deejaycar) May 30, 2018
‘ट्रिपल एक्स ४’चा शेवट एका बॉलिवूड डान्स नंबरने करू इच्छितो. निश्चितपणे त्यात दीपिका असेल. लुंगी डान्स कसा वाटेल?, असं ट्विट कारुसोने केलं. त्यामुळे एका स्पेशल बॉलिवूड डान्ससह दीपिकाची ट्रिपल एक्सच्या चौथ्या सीरिजमध्ये वर्णी लागल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ जेंडर केज ३’ या चित्रपटात दीपिका आणि विन डिझेलची जोडी दिसली होती. आता चौथ्या भागात निश्चितपणे दीपिकाच्या हॉलिवूडमधील बॉलिवूड स्पेशल लुंगी डान्सची प्रेक्षकांना प्रतीक्षा असेल.