सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रकाशझोतात आलेली प्रिया वारियर साऱ्यांनाच ठावूक असेल. तिच्या पहिल्या चित्रपटातील डोळा मारतानाचा हा व्हिडीओ होता. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला नाही. पण प्रिया मात्र प्रसिद्ध झाली. त्याच प्रियाला बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीने दीपिका पदुकोणने एक भन्नाट चॅलेंज दिलं आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन प्रियाला चॅलेंज दिलं आहे.
दीपिका सध्या तिच्या ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे दीपिका या चित्रपटाविषयीची रोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यात प्रिया वारियरला चॅलेंज दिलं आहे.
काय आहे दीपिकाचं चॅलेंज
दीपिकाने शेअर केलेला व्हिडीओ ‘छपाक’च्या सेटवरचा असून यात दीपिकाने प्रियाप्रमाणे डोळा मारला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ शेअर करत तिने प्रियाला पुन्हा एकदा असाच डोळा मारण्याचं चॅलेंज दिलं आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दीपिकाने ‘टेक दॅट प्रिया वारियर’ असं म्हटलं आहे. तसंच प्रियाला टॅगही केलं आहे.
दरम्यान, दीपिकाच्या आगामी ‘छपाक’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अॅसिडहल्ला पीडित लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून येत्या १० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.