यंदाच्या वर्षातील बॉलिवूडचा महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणून ‘पद्मावती’कडे पाहिले जात आहे. १ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करणी सेनेसारख्या संघटनांकडून या चित्रपटाला तीव्र विरोध होतोय. करणी सेनेने दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळी यांना उघडपणे धमकीही दिली. यावर आता दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

वाचा : धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

दिवसागणिक अधिक चिघळत चाललेल्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादावर प्रकाश पदुकोण म्हणाले की, वादविवाद हा चित्रपटसृष्टीचा अविभाज्य घटक आहे. या गोष्टी आपल्या हातात नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करणेच अधिक योग्य आहे. जे काही घडायचं असेल ते घडेल. आपण केवळ वाट पाहायची. सध्या तरी आम्ही चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला रामायणातील शूर्पणखेची आठवण करून देत नाक कापण्याची धमकी करणी सेनेकडून देण्यात आली असून मुंबई पोलिसांनी दीपिका व दिग्दर्शक भन्साळी यांची सुरक्षा वाढवली आहे.

वाचा : अभिनेते लिलीपूट यांच्यावर कर्जाचा डोंगर, मुलीने दिला आसरा

दरम्यान, ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक बदलांचे कारण देत चित्रपट पुन्हा निर्मात्यांकडे पाठविला असल्याचे कळते. यामुळे चित्रपटाचा प्रदर्शनाचा १ डिसेंबरचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर ही अफवा असून चित्रपट ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.