संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपटाचा पहिला ट्रेलर काल प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या पहिल्याच ट्रेलरने प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यश मिळवले आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारी दृश्य आणि मुख्य कलाकार दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांचा राणी पद्मावती, अल्लाउद्दीन खिल्जी आणि राजा रावल रतन सिंह यांच्या भूमिकांमधील रॉयल अवतार चित्रपट हिट होणार अशीच ग्वाही देणारा आहे.

वाचा : रणवीर सिंगच्या या पाच रुपांनी पद्मावती सिनेमाचा ट्रेलर झाला दमदार

याआधी ‘पद्मावती’च्या प्रदर्शनामध्ये बरेच अडथळे निर्माण झाले. अनेकदा त्याच्या प्रदर्शनाच्या तारखाही बदलल्या. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये निराशा निर्माण झाली होती. मात्र, ट्रेलर पाहिल्यानंतर आता सर्वांचीच निराशा दूर झाली आहे. रुपेरी पडद्यावर शाहिद – दीपिकाची जोडी पहिल्यांदाच येणे, रणवीरची खलनायकी भूमिका, संजय लीला भन्साळी यांचा ऐतिहासिक चित्रपट या सर्व गोष्टींचा विचार केला तर यावर्षीच्या ‘बाहुबली २’ चित्रपटाप्रमाणेच प्रेक्षकांना पुन्हा एकदा भव्य चित्रपटाचा अनुभव घेता येणार याबद्दल शंका नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय तसतशी चित्रपटप्रेमींमधील उत्सुकता अधिकच वाढतेय. १ डिसेंबरला ‘पद्मावती’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

वाचा : Padmavati Trailer VIDEO डोळ्यांचे पारणे फेडणारा ‘पद्मावती’चा ट्रेलर

इतकेच नव्हे तर २०१७ मध्ये बॉलिवूडला आलेली उतरती कळाही ‘पद्मावती’च्या यशामुळे दूर होण्याची शक्यताही वर्तविली जातेय. बॉक्स ऑफिसचे जुने विक्रम मोडून हा चित्रपट नवे विक्रम प्रस्थापित करण्याची चिन्हं आहेत. यावर्षात बॉक्स ऑफिसवर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘हिंदी मीडियम’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘जुडवा २’ या चित्रपटांनी बऱ्यापैकी कमाई केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, ‘पद्मावती’च्या प्रदर्शनामुळे सलमान खानच्या चिंतेत वाढ होणार असल्याचे दिसते. कारण, त्याचा आगामी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटही त्याच काळात प्रदर्शित होतोय. जूनमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाइट’ला बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे सलमान आणि त्याचे चाहते ‘टायगर जिंदा है’ कडून बरीच अपेक्षा करत आहेत. पण, ‘पद्मावती’चा ट्रेलर पाहता सलमानला बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा निराशेला सामोरं जावं लागू शकते.

दरम्यान, बॉक्स ऑफिसच्या आकड्यांची पर्वा न करणाऱ्या सलमानला ‘पद्मावती’ कशाप्रकारे आव्हान देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.