गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचंच आराध्य आणि लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी गणपती विशेष भागांची भव्यदिव्य मालिका घेऊन येत आहे. २२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. करोनाच्या या संकटकाळात गणपती उत्सवाला बंधनाची मर्यादा आहे. मात्र स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये ‘देवा श्री गणेशा’ या मालिकेच्या रुपात गणपती बाप्पालाच आपल्या घरी घेऊन येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाविषयीच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण या गोष्टींमागे असणाऱ्या अनेक रहस्यमयी कथांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. बाप्पाच्या जन्मापासून ते अगदी लग्नापर्यंतच्या अश्या गोष्टी ज्या आपण कधीही ऐकल्या आणि पाहिल्या नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न या अनोख्या मालिकेतून करण्यात येणार आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर गणेशोत्सव काळात चंद्रांचं तोंड पाहू नये अन्यथा चोरीचा आळ येतो असं ऐकीवात आहे. बाप्पाची झालेली फजिती पाहून चंद्र हसला आणि बाप्पाने चंद्राला शाप दिला ही गोष्ट प्रचलित आहेच. मात्र चंद्राला शाप दिलेल्या बाप्पाच्या भाळी चंद्र कसा? बाप्पा भालचंद्र कसा झाला? याची कथा मात्र बऱ्याच जणांना माहित नाही. ‘देवा श्री गणेशा’ या ११ भागांच्या विशेष मालिकेतून ११ ऐकलेल्या मात्र त्याविषयी फारशी माहिती नसलेल्या बाप्पाच्या पौराणिक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘दैनंदिन मालिकांच्या गर्दीत स्टार प्रवाह फक्त ११ विशेष भागांची मालिका घेऊन येत आहे. रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत ११ सशक्त आणि विशेष काहीतरी द्यायचा प्रयत्न आहे. सध्याच्या परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे स्टार प्रवाह आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या भव्य रुपाचं दर्शन घरोघरी घडवून आणणार आहे. बाप्पाच्या गोष्टींमध्ये लपलेले आणि माहित नसलेले पैलू या विशेष मालिकेद्वारे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकतील.’

२२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता सुरु होणाऱ्या स्टार प्रवाहच्या ‘देवा श्री गणेशा’ मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच बिग बजेट मालिका आकाराला येतेय. महाभारत, राधेकृष्ण यासारख्या भव्यदिव्य मालिका साकारणारे सुप्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ तिवारी यांच्या स्वस्तिक प्रॉडक्शन्सने ही भव्य मालिका साकारण्याचं आव्हान पेललं आहे. उमरगाम इथे या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला येत असून लवकरच शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deva shree ganesha new serial on lord ganesh ssv