‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातील एका साहसी दृश्याचं शूटिंग करताना देवदत्तच्या पायाला दुखापत झाली आहे. तरीदेखील ‘द शो मस्ट गो ऑन’ या नियमाप्रमाणे त्याने शूटिंग थांबू दिले नाही.
‘जय मल्हार’ या मालिकेमुळे देवदत्तने प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्याने साकारलेली खंडेरायाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. ही मालिका बंद झाल्यानंतर देवदत्त चित्रपटांमध्ये झळकला. जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटानंतर त्याच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. तो लवकरच एका चित्रपटात झळकणार असून त्या चित्रपटाविषयीची फारशी माहिती अद्याप समोर आली नाही. पण त्यातील एका दृश्याच्या शूटिंगदरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतरही देवदत्तने शूटिंग थांबू दिले नाही.
देवदत्तचा हा आगामी चित्रपट मराठी आहे की हिंदी हेसुद्धा अद्याप समजू शकले नाही. मात्र हा मोठा प्रोजेक्ट असल्याचं समजतंय. याबद्दल तो लवकरच अधिकृत घोषणासुद्धा करणार असल्याचं कळतंय.