श्रेयस तळपदे दिग्दर्शित ‘पोस्टर बॉइज’ या हिंदी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात सनी देओल, बॉबी देओल, श्रेयस तळपदे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ट्रेलर लॉन्चवेळी स्वतः धर्मेंद्रही उपस्थित होते. यावेळी धर्मेंद्र म्हणाले की, ते कधीही नसबंदी आणि दारुबंदी असे कथानक असलेल्या सिनेमांमध्ये काम करणार नाहीत. सिनेमाबद्दल बोलताना धर्मेंद्र म्हणाले की, ‘मराठीमध्ये या सिनेमाला फार मोठं यश मिळालं होतं. हिंदीमध्ये आता हा सिनेमा मराठीपेक्षाही मोठा होईल.’

‘मी गेल्या ५५ वर्षांपासून सिनेसृष्टीशी जोडलो गेलो आहे. आतापर्यंत सनी आणि बॉबीला नेहमीच पिळदार शरीरयष्टी असलेले हिरो म्हणून पाहण्यात आले आहे. पण, या सिनेमात हे दोघंही एका वेगळ्या भूमिकेत दिसतील. पुरुषांच्या नसबंदीवर आधारित असा हा सिनेमा आहे. माझी नसबंदी तर निसर्गही करु शकत नाही. मी श्रेयसला अशी संहिता घेऊन यायला सांगितले आहे ज्यात दारुबंदी आणि नसबंदी या गोष्टी नसाव्यात. अशा कोणत्यातरी बंदीवर सिनेमा करु ज्यात फार त्रास सहन करावा लागणार नाही’, असे धर्मेंद्र म्हणाले.

https://www.instagram.com/p/BW6oOZXhlu1/

नुकताच ‘पोस्टर बॉइज’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ८ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात सनी देओल, बॉबी देओल, श्रेयस तळपदे यांच्या मुख्य भूमिका आहेत. एका चुकीच्या जाहिरातीमुळे या तिघांच्या आयुष्यात कसा बदल होत गेला याचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. स्वतः श्रेयसने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

https://www.instagram.com/p/BWvE5SzD1NS/

मुळ मराठीमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन केलं होतं. श्रेयस मुळ सिनेमाचा निर्माताही होता. हिंदी सिनेमासाठी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रोडक्शन, सनी साऊंड प्राइवेट लिमिटेड आणि एफल्युएंस मूवीज प्राइवेट लिमिटेड यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. २४ जुलैला या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरवर लिहिले होते की, ‘आम्ही नसबंदी केली आहे, तुम्हीही करा.’ या पोस्टरला सनीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते.