गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता शाहरुख खान, आमिर खान आणि अभिषेक बच्चन यांच्या मुलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यांच्या शाळेविषयी जाणून घेण्यासाठी कुतूहलाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. अनेकदा अनोळखी विद्यार्थी भेटल्यावर गप्पांच्या ओघात त्यांच्या शाळेविषयीसुध्दा चर्चा करताना दिसून येतात. पण, सध्याचे सेलिब्रिटी किड्स याला अपवाद ठरू शकतात. सहसा त्यांना हा प्रश्न विचारण्याची वेळच येत नसावी. कारण, हिंदी चित्रपटसृष्टी आणि इतर काही क्षेत्रातील प्रसिद्ध मंडळींची मुलं एकाच शाळेत शिक्षण घेत आहेत. ती शाळा म्हणजे नीता अंबानी यांची धारुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल.

नुकताच या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. तेव्हा शाहरुख खानपासून पत्रकार अर्णब गोस्वामीपर्यंत बऱ्याच प्रसिद्ध मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हे प्रसिद्ध चेहरे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे किंवा परीक्षक म्हणून उपस्थित नव्हते, तर आपल्या मुलांचे परफॉर्मन्स पाहण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

आमिर खान-किरण राव यांचा मुलगा आझाद, अभिषेक-ऐश्वर्याची मुलगी आराध्या, हृतिक-सुझानची मुलं, शाहरुख खानचा छोटा अब्राम इत्यादी सेलिब्रिटी किड्स या शाळेत शिकत आहेत. त्याशिवाय चंकी पांडे, लारा दत्ता, विधू विनोद चोप्रा यांची मुलंसुद्धा याच शाळेत शिकतात. जवळपास सर्वच कलाकारांची मुलं या शाळेत शिक्षण घेत असून, त्यांना कोणत्याही सुविधेची कमतरता येथे जाणवू दिली जात नाही. सर्वसामान्य मुलांना या शाळेत प्रवेश मिळवणं म्हणजे त्यांच्या पालकांच्या खिशाला चटका लावणारं ठरु शकतं, याचा अंदाज लावता येणं सहज शक्य आहे. कारण, शाळेची फी इतकी जास्त आहे, की ती अनेकांना भुवया उंचावण्यास भाग पाडते.

https://www.instagram.com/p/BbpYBr1laZz/

https://www.instagram.com/p/Bc0UDEEFpxd/

सोशल मीडिया आणि इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार, २००३ मध्ये नीता अंबानी यांच्या अध्यक्षतेखाली या शाळेची सुरुवात झाली. या शाळेत ‘एलकेजी’ म्हणजेच ‘लोअर किंडर गार्डन’पासून’ दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल पूर्व येथे ही शाळा असून, त्यात सर्व सोयीसुविधा आहेत. हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या शाळेत लाखांच्या घरात वार्षिक फी आकारली जाते.

‘एलकेजी’ ‘लोअर किंडर गार्डन’पासून सातवीपर्यंतची फी – १ लाख ७० हजार रुपये
आठवी ते दहावी (आयसीएसइ बोर्ड) फी – १ लाख ८५ हजार रुपये
आठवी ते दहावी (आयजीसीएइ) फी – ४ लाख ४८ हजार रुपये, इतके शुल्क आकारले जाते. या शाळेत प्रवेस घेण्यासाठी सुरुवातीला २४ लाख रुपयांचे डिपॉझिटही भरावे लागत असल्याचे कळते. सेलिब्रिटींच्या मुलांमुळे शाळेलाही एक प्रकारची लोकप्रियता मिळाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.