बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात आता कोणतेच संबंध नाहीत. तरी आजही या दोघांचे नाव एकत्र आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात. या दोघांचे नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यामागचे कारण कळल्यावर बऱ्याचजणांना धक्का बसू शकतो. या दोघांचे नाव चर्चेत येण्यागामचे कारण आहे सलमानची एक्स मॅनेजर.
सलमानने त्याची एक्स मॅनेजर रेश्मा शेट्टी हिच्याशी काही काळापूर्वीच आपले व्यावसायिक संबंध तोडले हे सर्वांनाच माहिती आहे. या दोघांचे रस्ते वेगळे झाल्यानंतर आता ऐश्वर्याने रेश्माला कामावर ठेवल्याचे वृत्त ‘डेक्कन क्रोनिकल्स’ने दिले आहे. विशेष म्हणजे, पती अभिषेक बच्चनची चित्रपटसृष्टीतील डगमगती कारकिर्द सावरण्यासाठी तिने असे केल्याचे कळते.
वाचा : पाहा, विराट-अनुष्काला पंतप्रधानांनी काय गिफ्ट दिले
अभिषेकने करिना कपूरसोबत जेपी दत्ता यांच्या ‘रेफ्यूजी’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले होते. मात्र, वडील अमिताभ यांच्याप्रमाणे त्याला काही यश मिळाले नाही. असे असले तरी ‘बंटी और बबली’, ‘गुरु’ आणि ‘पा’ या चित्रपटांतून त्याने नक्कीच आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. सध्या अभिषेकच्या यशाचा आलेख एकाच ठिकाणी अडकला असल्यामुळे आता तो पुढे नेण्याचा भार ऐश्वर्याने तिच्या खांद्यावर घेतला आहे. त्याने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत जोर धरावा यासाठीच ऐश्वर्याने रेश्माला कामावर ठेवल्याचे कळते.
वाचा : बाळासाहेब ठाकरेच मला मराठी बोलण्याची प्रेरणा देतील- नवाजुद्दीन
सध्या अभिषेक कोणतेच नवीन चित्रपट स्वीकारत नसून, त्याच्या हातात असलेल्या चित्रपटावर पूर्ण लक्ष केंद्रित करतोय. संजय लीला भन्साळी यांच्या कवी, गीतकार साहिर लुधियान्वी यांच्यावरील बायोपिकमध्ये तो काम करतोय. त्यामुळे अभिषेकच्या यशाचा आलेख चढता ठेवण्याची जबाबदारी रेश्माला देण्यात आली आहे. रेश्मा ही मॅट्रिक्स इंडिया एण्टरटेन्मेन्ट कन्सलटन्ट्सची व्यवस्थापकीय संचालक असून, तिने सलमानसोबत नऊ वर्षे काम केले होते.