‘झिरो’ या चित्रपटानंतर अभिनेता शाहरुख खानचा कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. सोशल मीडियावर, पत्रकार परिषदमध्ये अनेकदा त्याला त्याच्या आगामी चित्रपटांविषयी प्रश्न विचारला असता, त्याने ठोस असं कोणतं उत्तरसुद्धा दिलं नाही. राजकुमार हिरानी यांच्या आगामी बिग बजेट चित्रपटात तो काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र या चित्रपटात सलमानसोबत स्क्रीन शेअर करावी लागणार असल्याने शाहरुखने चित्रपटाला साफ नकार दिल्याचं कळतंय. सलमानसोबत काम करण्यास नकार देऊन त्याने बिग बजेट चित्रपटाकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर येत आहे.

राजकुमार हिरानी यांना त्यांच्या चित्रपटात दोन नायकांची गरज आहे. यासाठी त्यांनी शाहरुख व सलमानची निवड केली होती. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांनी ही माहिती दिली होती. मात्र शाहरुखला कोणासोबत स्क्रीन शेअर करायचे नसून त्याला एकट्यालाच चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकायचे आहे. त्यामुळे आता पुन्हा त्या चित्रपटासाठी राजकुमार हिरानी यांना कलाकारांची शोधाशोध करावी लागत आहे.

शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. त्याआधी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटानेसुद्धा जेमतेम कमाई केली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर किंग खानला आता त्याच्या अभिनयाची जादू दाखवावीच लागणार आहे. यासाठी तो कोणत्या चित्रपटाची निवड करणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.