बी-टाउनमधील प्रसिद्ध जोड्यांमध्ये रितेश आणि जेनेलिया देशमुखचे नाव आवर्जून घेतले जाते. अनेकांना ‘कपल्स गोल’ देणाऱ्या जोड्यांमध्येही या जोडीचा समावेश आहे. आपल्या या आवडत्या जोडीची सर्व माहिती ठेवणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दलची एक गोष्ट कदाचित माहिती नसावी. ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रितेश आणि जेनेलियाची पहिली भेट कशी होती माहितीये का? नुकतेच या चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने रितेशने २००३मधील त्या आठवणींना उजाळा दिला.

वाचा : ..अन् मनिषावर खिळल्या सर्वांच्या नजरा

रितेशने लागोपाठ ट्विट करत सुरुवातीला जेनेलिया त्याच्याशी बोलण्यास कशी नाखूश होती आणि या चित्रपटाने कसे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले याचा खुलासा केला. त्याने ट्विट केलं की, ‘१५ वर्षांपूर्वी तुझे मेरी कसम प्रदर्शित झाला. पहिला चित्रपट, आयुष्य बदलले. एक आर्किटेक्ट अभिनेता झाला. सहअभिनेत्री जेनेलिया माझी बायको झाली.’ पुढे त्याने दिग्दर्शक के विजय भास्कर, निर्माता रामोजी राव आणि सिनेमॅटोग्राफर कबिर लाल यांचे चित्रपटासाठी त्याची निवड करण्यासाठी आभारही मानले.

पण यानंतर रितेशने केलेले ट्विट्स अधिक रंजक आहेत. ‘माझे वडील तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याने जेनेलिया त्यावेळी चित्रीकरणादरम्यान पहिले दोन दिवस माझ्याशी बोललीच नाही. तुझे सुरक्षारक्षक कुठे आहेत? असा तिने मला पहिला प्रश्न केला’, रितेशच्या या ट्विटनंतर बायको जेनेलियाही गप्प बसली नाही. तिने लगेच नवऱ्याला उत्तर देणारे ट्विट केले. तिने लिहिलं की, ‘अर्थातच.. मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे सुरक्षारक्षक नसतील आणि एक शांत मुलगा माझे हृदय चोरून नेईल असा विचार कोणाच्या मनात तरी येईल का?’

वाचा : मी क्रिकेटपटू किंवा श्रीमंत व्यवसायिकाशी लग्न करणार नाही- तापसी पन्नू

जवळपास आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश आणि जेनेलियाने २०१२मध्ये लग्न केले. त्यांना रिआन आणि राहिल ही दोन मुलं आहेत. मनदीप कुमारच्या ‘तेरे नाल लव्ह हो गया’ चित्रपटात ही जोडी शेवटची एकत्र झळकली होती.

Story img Loader