चार मैत्रिणींची कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलेला ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजतोय. कपड्यांवरून, ठराविक दृष्ये आणि संवादावरून काही लोकांनी चित्रपटाला ट्रोल केलं असलं तरी हा या वर्षाचा सर्वांत ‘ग्लॅमरस चित्रपट’ ठरतोय असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटातील करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या चौघींच्याही फॅशनेबल कपड्यांनी विशेष लक्ष वेधून घेतलं. त्यातही सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे चित्रपटात करिनाने लग्नात परिधान केलेल्या डिझायनर लेहंग्याची. अनेकांना या लेहंग्याची डिझाइन अत्यंत आधुनिक आणि फॅशनेबल वाटली पण सुमारे २५ वर्षांपूर्वीच हा लेहंगा डिझाइन करण्यात आला होता.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला या जोडीने तो लेहंगा २५ वर्षांपूर्वी डिझाइन केला होता. ऑफ शोल्डर पिवळ्या रंगाच्या लेहंग्याबद्दल संदीपने सोशल मीडियावर काही माहिती दिली आहे. ‘विंटेज गारमेंटचा हा लग्नातील लेहंगा आहे. आमच्या कलेक्शनमध्ये तो २५ वर्षांपासून आहे. सोनमची बहिण रिया जेव्हा हे कलेक्शन पाहायला आली तेव्हा आम्ही बरेच कपडे तिच्यासमोर ठेवले. त्यापैकी तिला हा लेहंगा खूप आवडला. लेहंगा आणि ब्लाऊजची डिझाइन जशीच्या तशी ठेवण्यात आली आणि करिनाच्या मापानुसार ते शिवण्यात आले. त्याला अजून मॉडर्न टच देण्यासाठी नव्याने फक्त दुपट्टा डिझाइन करण्यात आला आणि तो सर्वांनाच आवडला.’
https://www.instagram.com/p/BjlumJdjgPB/
वाचा : अशोक सराफ यांना ‘मामा’ का म्हणतात माहितीये?
‘वीरे दी वेडिंग’मध्ये फॅशनचा एक नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि अनेकांना तो आवडला. लव्ह, लग्न आणि लोचामध्ये अडकलेल्या या चार मैत्रिणींची कथा बॉक्स ऑफीसवर किती कमाई करण्यात यशस्वी ठरेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.