करोना विषाणूमुळे निर्माण झालेले अनिश्चिततेचे वातावरण मानसिक आजारांसाठी पोषक ठरत आहे. जीवाला असलेला धोका आणि समोर उभे ठाकलेले आर्थिक प्रश्न यांमुळे नैराश्य, चिंता (अॅन्झायटी) यांसारखे आजार बळावत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीवर अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी हिने एका शॉटफिल्मच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही शॉटफिल्म केवळ एक मिनिटाची आहे.
अवश्य पाहा – सोनू सूदच्या साथीदाराला पोलिसांनी मारली होती थोबाडीत; कारण…
दिगांगनाने इन्स्टाग्रावर ही फिल्म शेअर केली आहे. नैराश्य म्हणजे काय? अन् त्याच्यावर मात कशी कराल? याचं उत्तर तिने या एक मिनिटाच्या फिल्ममधून दिलं आहे. “आपले विचार अत्यंत महत्वाचे असतात. जसा आपण विचार करतो तसेच आपण वागतो. आपल्या विचारांवरच आपली मानसिक स्थिती आधारलेली असते. नैराश्य हे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारचा दु:खद विचार आहे. जो आपल्याला सतत दु:खी ठेवतो. चूकीचे निर्णय घ्यायला प्रवृत्त करतो. त्यामुळे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. सतत सकारात्मक विचार करा.” अशा आशयाची कॉमेंट तिने या व्हिडीओवर केली आहे. दिगांगनाची ही फिल्म सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
नैराश्यावरील उपचार आणि औषधे – डॉ. सुरेश पाटील, मानसोपचारतज्ज्ञ
नैराश्य आणि चिंतेच्या रुग्णांचे म्हणणे आधी ऐकू न घ्यावे लागते, त्यांना समजून घ्यावे लागते. समुपदेशनातून त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हियर थेरपी’ आणि ‘कॉग्निटिव्ह बिहेव्हियर थेरपी‘ यांचा आधार घेतात. याद्वारे रुग्णांच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यास मदत केली जाते. अधिक गरज भासल्यास औषधे दिली जातात. नोकरी कधीच शाश्वत नसते. सध्या नोकरी गेली असेल तर दुसरी संधी मिळेल. त्यासाठी आपली कौशल्ये विकसित करावीत. भूतकाळाचा आणि भविष्याचा विचार न करता वर्तमानात जगा. भीतीचा सामना करा. नकारात्मक बातम्या, सतत नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्ती यांच्यापासून दूर राहा. नात्यांमधला संवाद वाढवा. चांगले दिवस येणार आहेत.