ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांना ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाते. दिलीप कुमार आणि शिवसेना अध्यक्ष बाळ ठाकरे यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, एका कारणामुळे त्यांची मैत्री तुटली होती.
बाळासाहेब ठाकरेंनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. “आम्ही एकत्र जुन्या ‘मातोश्री’च्या गच्चीत बसायचो. महिलांना बारस्याच्या वेळी मिळातातना त्या घुगऱ्या त्या मा तळायची त्यात ती खोबर आणि कोथिंबीर घालायची. मी त्यावेळी बियर पित होतो आणि मी गच्चीत बसायचो. दिलीप कुमारचा फोन यायचा बाळु साहेब काय करत आहात? मी म्हटलं की बियर पितोय. तर दिलीप कुमार म्हणाला येऊ का? मी म्हटलं ये आणि आम्ही दोघं गच्चीत बसायचो. त्याला ते चने भयंकर आवडले. त्यानंतर तो फोन करून विचारयचा की चने खायला येऊ का? मी म्हणायचो ये अशी आमची मैत्री होती,” असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले.
त्यानंतर बाळासाहेबांनी मैत्री कशी तुटली ते सांगितलं आहे. ते म्हणाले, “जेव्हा दिलीपने पाकिस्तान सरकारचा ‘किताब ए पाकिस्तान’ स्वीकारला त्यानंतर मी मैत्री तोडली. त्याची आणि सुनील दत्तशी मैत्री तोडली कारण तो दिलीपसोबत गेला होता. मी म्हटलं मला नाही आवडलं हे तुला हिंदुस्तानने मोठं केलं पाकिस्तानने नाही.”
दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन कुटुंबीयानी जुहू येथील दफनभूमीत सायंकाळी पाच वाजता दफनविधी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.