दिलीप कुमार यांची नात सायेशाने नुकतंच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. ‘शिवाय’ या चित्रपटात सायेशाने भूमिकाने साकारली. अभिनयापासून भिन्न अशा वातावरणात राहिलेल्या सायेशाने अभिनयातच करिअर करायचं ठरवलं होतं. अभिनेत्रीसाठी लागणारे सर्व गुण आपल्यात असल्याचे सायेशाने सिद्ध केलंय. नुकताच तिने एड शीरनच्या ‘शेप ऑफ यू’वर नृत्य करतानाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमधून आपल्याला सायेशाचं नृत्यकौशल्य पाहायला मिळते. ‘तुमचं आवडतं गाणं जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला उठून नृत्य करावंसच वाटतं,’ असं कॅप्शन तिने या व्हिडिओखाली लिहिलंय. ‘शिवाय’ चित्रपटात काम करण्याआधी सायेशाने तेलुगू चित्रपटातंही काम केलं. दाक्षिणात्य चित्रपटांमधील अभिनेता अखिलसोबत तिने भूमिका साकारली आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. दोन आगामी तामिळ चित्रपटांमध्येही सायेशा भूमिका साकारणार आहे. याव्यतिरिक्त आणखी एका तेलुगू चित्रपटातही ती भूमिका साकारणार आहे.

वाचा : अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’चा ट्रेलर प्रदर्शित

‘वनमगन’ या आपल्या आगामी तामिळ चित्रपटातील गाणं प्रभू देवाने कोरिओग्राफ केले आहे. प्रभू देवासोबत काम करण्याचं स्वप्न सत्यात उतरल्याचे सायेशाने सांगितले, ‘तामिळमधील माझं पहिलंच गाणं प्रभू देवा कोरिओग्राफ करतील हे मला माहितीच नव्हतं. त्यांनी माझ्या नृत्याचा एक व्हिडिओ पाहिला आणि त्यांना तो आवडला. माझं गाणं कोरिओग्राफ करण्यात त्यांची हरकत नसल्याचं त्यांनी दिग्दर्शक विजय यांना सांगितलं. त्यांच्यासोबत काम करण्याचं माझं स्वप्न सत्यात उतरलंय.’ आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने सायेशा येत्या काळात बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करेल हे नक्की.

Story img Loader