नृत्यदिग्दर्शिका फराह खान सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. ती नेहमीच विविध विषयांवर ट्विट करत असते, महत्त्वाच्या मुद्द्यावर मतप्रदर्शन करत असते. सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टमुळे ती चर्चेत येते हेसुद्धा तितकेच खरे. चित्रपटसृष्टीत आपल्या हटके अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या फराहच्या ट्विटने पुन्हा एकदा अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सेलिब्रिटी त्यांच्या घरात काम करणाऱ्यांना नेहमीच त्यांच्या कुटुंबाचा एक भाग समजतात, त्यांना तशी वागणूकही देतात. त्यामुळे त्या व्यक्तींनाही सेलिब्रिटींविषयी आत्मियता वाटते. याचाच प्रत्यय सध्या फराहच्या ट्विटमधून पाहायला मिळत आहे. तिने नुकतेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करत अनेकांचेच लक्ष वेधले आहे. तिने घरात काम करणाऱ्या आचाऱ्याचा फोटो पोस्ट करत तो सुट्टीवरुन परतण्याचा आनंद व्यक्त केला आहे. आचाऱ्याच्या अनुपस्थितीत फराहच्या नाकीनऊ आले असल्यामुळे ज्यावेळी वसंत प्रजापती हा तिचा आचारी परतला तेव्हा तिने त्याचे जंगी स्वागत करत त्याचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला. ‘माझा आचारी गावावरुन परतला आहे. आता सर्वकाही ठीक होईल’, असे ट्विट करत तिने आनंद व्यक्त केला. फराहच्या घरी चवदार पदार्थ बनवणारा हा वसंत प्रजापती एका रिअॅलिटी शोचा स्पर्धक होता.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

२००५ मध्ये पार पडलेल्या ‘इंडियन आयडॉल’मध्ये तो सहभागी झाला होता. पार्श्वगायक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या वसंतला नशिबाने साथ दिली नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून मग त्याने आपली स्वप्नं दूर सारत फराहच्या घरी आचाऱ्याचे काम करण्यास सुरुवात केली. तो मुळचा झारखंडचा असून, आजही त्याची संगीतसाधना सुरुच आहे. आपल्या वाट्याला अपयश आले असले तरीही त्याची महत्त्वाकांक्षी वृत्ती मात्र कमी झालेली नाही.