दिग्दर्शक हंसल मेहता यांचा ओमर्ता सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सिनेसमिक्षकांकडून या सिनेमाचे भरभरून कौतुक केले जात आहे. यादरम्यान, या सिनेमातील एका दृश्याची फार चर्चा होताना दिसत आहे. या दृश्यात राजकुमार रावच्या गाडीला चेक पोस्टवर थांबवले जाते. पोलीस त्याला गाडीच्या बाहेर यायला सांगतात. पोलिसांना तो मुस्लिम आहे की त्याने मुस्लिम मुलीशी लग्न केले हे जाणून घ्यायचे असते.

मेहता म्हणाले की, त्यांनाही अशा सांस्कृतिक भेदभावाचा सामना करावा लागला होता. दिग्दर्शकाने सांगितले की, ‘ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी दाढी ठेवायचो. माझे संगीतचे गुरू गुलाम मुस्तफा खान यांनी मला दाढी ठेवायला मनाई केली होती. कारण दाढीमध्ये मी मुस्लिम वाटायचो.’ ते पुढे म्हणाले की, ‘ते (गुलाम मुस्तफा) आपल्या कोणत्याच मुलाला दाढी वाढवू देत नव्हते. कारण दाढीमुळे त्यांची मुलं मुस्लिम म्हणून ओळखली जावी असं त्यांना वाटत नव्हते. तो अनुभव कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहिला. ज्याचा मी ओमर्तामध्ये उपयोग केला.’

मेहता म्हणाले की, ‘ही फार भयानक परिस्थिती आहे. मुस्लिम युवक धार्मिक गोष्टींमुळे ओळखले जातील म्हणून दाढी ठेवायला घाबरतात. तर हिंदूही याच कारणामुळे दाढी ठेवायला घाबरतात. असेच सुरू राहिले तर भविष्यात ‘दाढी ठेवली जायची’ असेच म्हणावे लागेल.’

ओमर्ताला भलेही चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण तरीही मोठ्या प्रमाणात प्रेक्षक चित्रपटगृहात वळताना दिसत नाहीत. याबद्दल बोलताना मेहता म्हणाले की, ‘हॉलिवूड सिनेमा अँवेंजर्समुळे ओमर्ताला चांगली ओपनिंग मिळाली नाही. आम्हाला असा एकही शो देण्यात आला नाही जो प्रेक्षकांच्या मोकळ्या वेळेशी जुळून घेणारा असेल. याशिवाय सिनेमाला अ प्रमाणपत्र दिल्याने सिनेमाच्या कमाईवर त्याचा परिणाम झाला.’