जेम्स कॅमरुन दिग्दर्शित ‘टायटॅनिक’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २० वर्षे उलटली आहेत. पण, तरीही प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटातील प्रत्येक दृश्य, आजही जिवंत आहे. स्वप्नवत जहाजात खुललेल्या या प्रेमकथेचा असा करुण अंत होईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. चित्रपट अनेकदा पाहुनही प्रेक्षकांना त्याचा अंत हा चांगलाच व्हावा, ‘जॅक’ आणि ‘रोझ’ यांची एकमेकांना आयुष्यभराची साथ लाभावी अशीच अपेक्षा आजही असल्याचे पाहायला मिळते.
अभिनेत्री केट विन्सलेट हिने साकारलेली ‘रोझ’ आणि अभिनेता लिओनार्डो दी कॅप्रिओ याने साकारलेला ‘जॅक’ या दोन्ही पात्रांनी चित्रपटाच्या शेवटच्या दृश्याच्या वेळी अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला होता. ज्या दरवाजाचा आधार घेत ‘रोझ’चे प्राण वाचले होते, त्या दरवाजावर इतकी जागा तर होतीच की ‘जॅक’ही त्यावर सहज मावू शकत होता आणि त्याचे प्राणही वाचले असते. पण नेमके, असे का झाले नाही हाच प्रश्न अनेकांच्या मनात कित्येक वर्षांपासून घर करत होता. सरतेशेवटी दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांनी या प्रश्नाचे उत्तर देत सर्व शंका दूर केल्या.
पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…
‘व्हॅनिटी फेअर’ला दिलेल्या मुलाखतीत कॅमरुन यांनी याविषयीचा खुलासा केला. ‘रोझ’ने ‘जॅक’चे प्राण का वाचवले नाहीत, या प्रश्नाचे उत्तर देत कॅमरुन म्हणाले, ‘जर त्याचे (जॅकचे) प्राण वाचले असते तर चित्रपटालाच काही अर्थ राहिला नसता. एखाद्याचा अंत आणि विरह हाच या चित्रपटाचा गाभा होता. त्यामुळे ‘जॅक’चा मृत्यूच होणार होता.’ आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत ते म्हणाले, ‘२० वर्षांनंतरही त्या सर्व गोष्टींविषयी चर्चा होणे हे खरंतर हास्यास्पद आहे. पण, त्या दृश्यासाठी कलात्मक स्वातंत्र्य घेण्यात आले होते. जॅकचा पाण्यात बुडून किंवा इतर कोणत्या तरी दुर्दैवी घटनेत मृत्यू होणारच होता. त्यामुळे ‘रोझ’ (केट)सोबत तो चित्रपटाच्या शेवटीही दिसेल हे शक्यच नव्हते. या सर्व गोष्टींमध्ये वैज्ञानिक कारणं नसून, या गोष्टी कलेच्या अंगाने फार महत्त्वाच्या होत्या.’ प्रेमाची वेगळी परिभाषा मांडणाऱ्या ‘टायटॅनिक’विषयी असे प्रश्न आजही विचारले जाणे हे पाहून चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज येतोय.