काही दिवसांपूर्वी हॉलिवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइनवर अनेक नामांकित अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. या आरोपांनंतर सोशल मीडियावर ‘मी टू’ #MeToo हा हॅशटॅग वापरून जगभरातील महिलांनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला. ही बातमी ताजी असतानाच हॉलिवूडच्या आणखी एका दिग्दर्शकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. ऑस्करसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक जेम्स टोबॅकवर ३८ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

‘लॉस एँजेलिस टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार १९८०च्या दशकात टोबॅकने ३८ महिलांचे लैंगिक शोषण केले होते. त्या काळात काही महिला चित्रपटविश्वात कामाच्या शोधात आल्या होत्या. या ३८ महिलांपैकी ३१ महिलांनी स्वत:हून समोर येऊन ही बाब सर्वांसमोर आणली. एकदा दोनदा नाही तर वारंवार टोबॅकने आमचे शोषण केल्याची व्यथा या महिलांनी मांडली.

वाचा :  शाहरुखच्या चित्रपटामुळे चाहत्याला मानसिक त्रास

जेम्स टोबॅकविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल झाली आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क स्ट्रीट येथे तो वेगवेगळ्या महिलांना भेटत असे. त्यांना चित्रपटांत काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना एका हॉटेलमध्ये बोलावले जाई. हॉटेलच्या रुममध्ये जेम्स त्यांचे लैंगिक शोषण करत असे. याप्रकरणी अमेरिकन पोलिसांनी जेम्सची चौकशी सुरू केली आहे.