हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा लेखक जॉन लाफिया यांचा मृत्यू झाला आहे. जॉन ६३ वर्षांचे होते. variety.com या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी २९ एप्रिल रोजी आत्महत्या केली. लॉस एंजेलिस कंट्री कॉर्नर ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

अल्फेड हिचकॉक, जॉर्ज रोमेरो, स्टिफन किंग यांसारख्या भयपट दिग्दर्शकांच्या पावलांवर पाउल ठेवत जॉन लाफिया यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. जॉन देखील भयपटांसाठीच प्रसिद्ध होते. त्यांनी आजवर ‘द रॅट्स’, ‘मॅन्स बेस्ट फ्रेंड्स’, ‘चाईल्ड प्ले’, ‘मॉन्स्टर’ यांसारख्या अनेक सुपरहिट भयटांच्या पटकथा लिहिल्या आहेत.

‘चाईल्ड प्ले २’ या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाले होते. ‘चाईल्ड प्ले’ या भयपट मालिकेतील हा दुसरा चित्रपट होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील त्यांनीच स्विकारली होती. १९९० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्याकाळी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने जवळपास ३.५८ कोटी अमेरिकी डॉलर्सची कमाई केली होती. त्यांच्या मृत्यूमुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाव्दारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.