बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान याने मुघल सम्राज्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झालाय. मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणे हे अडचणीचे तसेच लज्जास्पद वाटते असं कबीर खान म्हणाला आहे. हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय कथानकानुसार हे चित्रपट बनवले जातात तसेच ते ऐतिहासिक संदर्भांवर आधारित नसतात असा आक्षेपही कबीर खानने घेतलाय. तसेच मुघलांना चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत पाहून आपल्याला त्रास होतो असंही कबीर म्हणालाय.

न्यूयॉर्क, बजरंगी भाईजान सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या कबीर खानने नुकतीच एक मुलाखत दिली. मुघलांना कमी लेखणारे चित्रपट आपण सहन करु शकत नाही असं कबीर मुलाखती म्हणाला आहे. तसेच त्याने मुघल हे भारत घडवणारे खरे शासक होते असंही म्हटलं आहे.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कबीरने, “मला हे फार अडचणीचे आणि लज्जास्पद वाटते. कारण लोकप्रिय कथानकासाठी हे सारं केलं जात हे पाहून मला अस्वस्थ व्हायला होतं. निर्मात्याने काही मिळवलं असेल आणि त्याला एखादा मुद्दा सिद्ध करायचा असेल तर तो वेगळ्या विचारसरणीने तो मांडू शकतो. त्यामुळेच तुम्हाला मुघलांना कमी लेखायचं असेल तर त्यासंदर्भातही थोडं संशोधन करुन चित्रपट बनवले पाहिजे. तसेच मुघलांना कायम व्हिलन का दाखवलं जातं हे प्रेक्षकांना समजलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर इतिहास आणि संशोधन वाचलं तर मुघलांना नकारात्मक भूमिकेत का दाखवलं हा फार कठीण प्रश्न वाटतो. माझ्या मते ते देश घडवणारे खरे शासक होते. मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या असं तुम्ही म्हणत असाल तर ते कशाच्या आधारे म्हणताय हे दाखवलं पाहिजे. नुसतं बोलून मोकळं होणं योग्य नाही. यावर खुली चर्चा करा. एखादं कथानक लोकप्रिय होईल म्हणून त्यानुसार कथानक रचू नका,” असं मत व्यक्त केलं आहे.

“भारताच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या कालावधीत होऊन गेलेल्या मुघल आणि इतर मुस्लीम शासकांना कमी लेखण्याचं काम आज फार सोप्प आहे. साचेबद्ध मांडणीमध्ये त्यांना अडकवणं हे मला फार त्रासदायक वाटतं. दुर्देवाने मला असं कथानक असणाऱ्या चित्रपटांबद्दल आदर वाटत नाही. अर्थात हे माझं खासगी मत आहे. मी बहुसंख्य प्रेक्षकांसाठी मत व्यक्त करु शकत नाही मात्र मला नक्कीच अशापद्धतीचं कथानक पाहिल्यावर त्रास होतो,” असं कबीरने पुढे बोलताना म्हटलं आहे.

मागील काही वर्षांमध्ये ‘पद्मावत’, ‘पानीपत’, ‘तान्हाजी’ यासारख्या चित्रपटामध्ये मुघल शासकांबद्दलचं कथानक दाखवण्यात आलंय. ‘तान्हाजी’मध्ये नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खाननेही गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेल्याचं म्हटलं होतं. सैफने फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये, “काही कारणासाठी मी उघडपणे भूमिका घेतली नाही. कदाचित मी पुढील वेळेस भूमिक घेईल. मात्र ही भूमिका साकारताना मला फार आनंद झाला. मात्र लोक जेव्हा याचा इतिहास असं म्हणतात तेव्हा मला तो इतिहास वाटत नाही. इतिहास काय आहे मला माहितीय,” असं म्हटलं होतं.