मधुर भांडारकर यांची भावना
व्हिडिओ कॅसेट विक्रीचा व्यवसाय रत होतो, पण दिग्दर्शक व्हायचे नक्की होते. त्यातूनच ‘दूध का कर्ज’ चित्रपटासाठी सहायक म्हणून पडेल ती कामे करत राहिलो. ‘त्रिशक्ती’ हा चित्रपट दिग्दर्शित केला, तोही जोरदार आपटला. पण ‘चित्रपट चालला नसला तरी तू चालशील’ असे म्हणत सदाशिव अमरापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले. नंतर ‘चांदनी बार’ मिळाला आणि त्यांचे भविष्य खरे ठरले, अशी भावना ‘चांदनी बार’, ‘पेज थ्री’, ‘कॉर्पोरेट’, ‘हिरॉईन’, ‘ट्रॅफिक सिग्नल’ या चित्रपटांचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी रविवारी व्यक्त केली.
ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘दिग्दर्शकाच्या नजरेतून’ या प्रकट मुलाखतीतून रीमा अमरापूरकर यांनी भांडारकर यांना बोलते केले. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, ज्येष्ठ साहित्यिक-सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आणि अमरापूरकर कुटुंबीय या वेळी उपस्थित होते.
भांडारकर म्हणाले,की माझे चित्रपट सामाजिक विषयांवर बेतलेले असतात त्यामुळे ते प्रेक्षकांना, समीक्षकांनाही आवडतात आणि ते व्यवसायदेखील करतात याचा मला आनंद वाटतो. आणीबाणीसारख्या विषयांवर अनेकांनी पुस्तके लिहिली.
पुस्तके प्रकाशित होण्याआधी त्यातील मजकुरावर प्रश्न उभे रहात नाहीत. मग त्याच विषयावर चित्रपट तयार केला तर हल्ले का होतात, असा सवाल त्यांनी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाचा दाखला देत उपस्थित केला.
विनोद तावडे यांनी अमरापूरकर यांच्या स्मृती जागविल्या. अनेक कलाकार रिकाम्या वेळात समाजासाठी काम करतात, पण अमरापूरकर यांचा सामाजिक कामातील झपाटा पाहता ते उर्वरित वेळात अभिनय करत असे म्हणता येते, असेही तावडे म्हणाले.
आईची माया लावणारा मित्र!
सदाशिव हा सच्चा आणि भावनाशील माणूस होता, त्याचे जाणे म्हणजे माझ्याच अस्तित्वाचा लचका तोडल्यासारखे होते. आठवण आली की मागचा पुढचा विचार न करता पुण्याला निघून येणारा, सुनंदाच्या आजारपणात रुग्णालयाचे बिल परस्पर भरुन टाकणारा किंवा माझ्या मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी आठ दिवस पुण्यात येऊन माझ्याबरोबर रुग्णालयात बसणारा आणि शुश्रूषा करणारा सदाशिव हा आईची माया लावणारा मित्र होता, अशा आठवणी डॉ. अनिल अवचट यांनी जागविल्या.