कलाविश्वात योगदान देणाऱ्या प्रत्येक कलाकाराला विविध रुपांनी त्यांच्या कलेची पोचपावती मिळते. मग ती प्रेक्षकांची दाद असो किंवा एखादा पुरस्कार. आपल्या कलेचं, आपल्या कामाचं चीज झाल्याचीच अनुभूती प्रत्येक कालाकाराला यातून मिळते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा सध्या असाच अनुभव घेत आहे. तिच्या या आनंदाचं कारणही तसंच आहे. कारण, सोनालीच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल सोनालीने लोकसत्ता डॉट कॉमशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली. नेहमीच चौकटीबाहेरच्या भूमिकांना मोठ्या ताकदीने साकारणाऱ्या सोनालीच्या आनंदाला जणू उधाणच आलं होतं. ‘पुरस्कार मिळाल्याचं ऐकून मला खूपच आनंद होतोय. मुळातच हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा आणि ‘स्पेशल’ व्यक्तींना नजरोसमोर ठेवून करण्यात आला होता आणि तितक्याच प्रभावीपणे तो सादरही करण्यात आला. त्यामुळे हे श्रेय खऱ्या अर्थाने दिग्दर्शक प्रसाद ओकचं आहे असंच म्हणावं लागेल’, असं सोनालीने सांगितलं. अतिशय महत्त्वाचा विषय हाताळण्याचं त्याने दाखवलेलं धाडस प्रशंसनीय असल्याचंही तिने स्पष्ट केलं.
‘कच्चा लिंबू’च्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडेकर यांच्या अभिनयाने सर्वांच्याच मनाच घर केलं. तर दिग्दर्शक रवी जाधवनेसुद्धा या चित्रपटाच्या निमित्तामे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याशिवाय मनमीत पेमच्या अभिनयाची सुरेख झलकही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा चित्रपट सर्वच बाजूंनी उजवा ठरला असं म्हणायला हरकत नाही.
वाचा : 65th national film awards : ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
कलाकारांचा दमदार अभिनय, कथानकामध्ये असणारं सामर्थ्य आणि त्याला मिळालेली प्रसादच्या दिग्दर्शनाची जोड या सर्व गोष्टींची सुरेख घडी बसली. ‘कच्चा लिंबू’च्या निमित्ताने अतिशय महत्त्वाच्या विषयाला चित्रपटाच्या माध्यमातून तितक्याच प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात संपूर्ण टीम यशस्वी ठरली आहे. ‘कच्चा लिंबू’सोबतच ‘म्होरक्या’, ‘मयत’, ‘मृत्यूभोग’, ‘पावसाचा निबंध’ यांसारख्या मराठी चित्रपट आणि लघुपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.