मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी तरडेंसोबत अभिनेते रमेश परदेशी आणि कार्यकारी निर्माते विशाल चांदणेही होते. सासवडजवळील हिवरे गावात महादेव मंदिरासमोर तरडे यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार महादेव मंदिरासमोरील वळणावर चालकाचा गाडीवर ताबा सुटल्याने गाडीने रस्ता सोडला ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. गाडीमधील एअर बॅग वेळीच ओपन झाल्याने कोणालाही कोणतीही इजा झाली नाही. या अपघातासंदर्भात माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘प्रवीण तरडे, रमेश परदेशी सुखरुप असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका,’ असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कालच (मंगळवारी) पुणे सोलापूर मार्गावर वरकुटे फाटा येथे रात्री दीडच्या सुमारास प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीलाही अपघात झाला होता. या अपघातामध्ये आनंद शिंदे यांच्यासहीत तीन जण किरकोळ जखमी झाले होते.