१९९७ मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेता शाहरूख खानचा ‘परदेस’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरला. महिमा चौधरी आणि शाहरुख खान या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकलेली. शाहरुख महिमासोबत अपूर्व अग्निहोत्रीसुद्धा झळकला होता. मात्र, दिग्दर्शक सुभाष घई यांच्या प्रॉडक्शन हाऊसला महिमाच्या जागी माधुरी दीक्षित आणि अपूर्वच्या जागी सलमान खानला घ्यायचे होते. सुभाष घई यांनी नुकताच एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला.

या कार्यक्रमात ते म्हणाले की, ‘बरेच हिट चित्रपट दिल्यानंतर ‘त्रिमूर्ती’ हा मुक्ता आर्ट्सचा पहिला फ्लॉप चित्रपट ठरला होता. त्यामुळे मी स्वत:च्या शैलीत एक वेगळी कथा लिहिण्याचा विचार केला. जेव्हा चित्रपटाची कथा लिहून झाली, तेव्हा कोणत्या कलाकारांना त्यात घ्यावं यावरून बरीच चर्चा झाली. शाहरूखसोबत सलमान आणि माधुरीची जोडी उत्तम ठरेल असं प्रॉडक्शन हाऊसचं म्हणणं होतं.’

‘मी ‘खलनायक’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माधुरीला भूमिकेबद्दल समजावलंही होतं. मात्र, मला शाहरूखसोबत एका नव्या चेहऱ्याला संधी द्यायची होती,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘परदेस’मध्ये तिन्ही भूमिका सुपरस्टार्सनी साकारावी अशी प्रॉडक्शन हाऊसची इच्छा होती, तर सुभाष घई यांना हे अमान्य होते. यावरून बरेच मतभेद झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

वाचा : क्रिती-सुशांतची गुपचूप भेट!

यासंदर्भात पुढे ते म्हणाले की, ‘मी सर्वांना हेच समजावण्याचा प्रयत्न करत होतो की चित्रपटाची कथा पाहता शाहरूख, माधुरी आणि सलमान हे तीन जण यामध्ये योग्य वाटत नाहीत. मला अशा एका अभिनेत्याला घ्यायचे होते जो ”एनआरआय’ वाटेल. म्हणूनच मी अपूर्वला संधी दिली. माझ्यासाठी हे एक मोठं आव्हानंच होतं. मात्र, अखेर महिमा, शाहरूख आणि अपूर्व या तिघांना एकत्र आणण्यात मला यश मिळालं.’
सुभाष घई यांचा हा निर्णय अर्थातच फायद्याचा ठरला असं म्हणायला हरकत नाही. ‘परदेस’ चित्रपटातून महिमा चौधरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि तिचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफीसवर प्रचंड गाजला.