बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयामुळे सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. आज ती आपल्यात नाही. परंतु तिच्या चित्रपटांमुळे ती कायम आपल्यात असल्याचा भास होतो. हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्याची जागा आज कलाविश्वात कोणीच घेऊ शकत नाही, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
वयाच्या १४ व्या वर्षी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या दिव्याला सुरुवातीच्या काळापासूनच अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. दिव्याने आपल्या चित्रपटात काम करावं अशी प्रत्येक दिग्दर्शकाची इच्छा होती. त्यामुळे अनेक दिग्दर्शकांनी तिच्या आई-वडिलांना गळही घातली होती. मात्र दिव्याने वयाच्या १६ व्या वर्षी खऱ्या अर्थाने कलाविश्वात पदार्पण केलं. केवळ अभिनयच नव्हे तर तिच्या सौंदर्यावरही अनेक जण भाळले होते. त्यामुळे त्याकाळी बऱ्याच निर्मात्यांनी दिव्याला आधीच चित्रपटासाठी साइन करून घेत होते. मात्र तिच्या निधनानंतर तिने साईन केलेले चित्रपट अर्धवटचं राहिले. त्यामुळे शेवटी दिग्दर्शकांना दुसऱ्या अभिनेत्रींसोबत पुन्हा चित्रीकरण करावं लागलं. विशेष म्हणजे दिव्याच्या जाण्यामुळे एक अभिनेत्री रातोरात स्टार झाली.
खूप कमी जणांना माहित असेल की, ‘मोहरा’चे दिग्दर्शक राजीव राय यांनी सुरुवातीला मुख्य अभिनेत्री म्हणून दिव्याला चित्रपटात घेतले होते. तिने या चित्रपटातील काही दृश्यंही चित्रीत केली होती. पण, त्याच दरम्यान आलेल्या दिव्याच्या मृत्युच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. राजीव रायचा ‘मोहरा’ शेवटी अर्ध्यावरच लटकला. त्यानंतर नव्या हिरोईनचा शोध घेत असताना राजीव रायने रविना टंडनला चित्रपटात घेतले. त्यावेळी रविना बरीच चर्चेत होती. तेव्हा ती चित्रपटसृष्टीत नवीन होती. पण तिच्या पदार्पणातील चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळालेली. तिचा ‘दिलवाले’ चित्रपट हिट झाला होता.
वाचा : ट्रम्प यांची मुलगी इव्हान्का परिधान करुन आली वर्षभरापूर्वीचा ड्रेस; जाणून घ्या किंमत
१९९४ मध्ये ‘मोहरा’ प्रदर्शित झाला आणि त्यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा तो दुसरा चित्रपट होता. पुरस्कार सोहळ्यांमध्येही या चित्रपटाने नाव कमविले. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला नऊ नामांकन मिळाली होती. रविनाच्या अभिनयाचीही बरीच प्रशंसा झाली होती. ‘मोहरा’ च्या यशाने रविनाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवले. त्यानंतर ती अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये झळकली.