राहणीमानावरून टिप्पणी करणाऱ्या, त्याचप्रमाणे करण जोहरसोबत काम करू नको आणि ड्रग्स घेऊ नको असा सल्ला देणाऱ्या नेटकऱ्याला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने सडेतोड उत्तर दिलं. सोमवारी मुंबईतील वीज पूर्णपणे गेल्यानंतर दिव्यांकाने एक ट्विट केलं आणि त्यावरूनच हा वाद सुरू झाला.

मुंबईकरांना सोमवारी ‘बत्ती गुल’चा अनुभव आल्यानंतर दिव्यांकाने ट्विट करत लिहिलं, ‘काम से निकले, अब बेकार और बेजार से फिर रहै है. भई कोई बताएगा आज बंबई में बिजली क्यों नही है?’ त्यावर दिव्यांकाला उपरोधिक टोला लगावत एका ट्विटर युजरने म्हटलं, ‘एक दिवस मेकअपविना, एसीविना राहायला शिका मॅडम.’ हे वाचून दिव्यांकाचाही पारा चढला. तिने त्या ट्विटर युजरला प्रत्युत्तर देत पुढे लिहिलं, ‘कारण नसताना हिरो बनू नका अंकल. काम तर सरकारी होतं आणि त्यात मेकअपची गरज नव्हती. तुम्ही तर अशा प्रकारे विशेष टिप्पणी करता जसं की जागोजागी बिग बॉसचे कॅमेरे लावलेले असावेत. काहीतरी चांगलं लिहा, आशीर्वाद द्या, किंवा मग स्वत:च्या कामाशी काम ठेवा.’

आणखी वाचा : ‘किती जाड झालीये, ही कसली हिरोईन’; जेव्हा स्पृहा जोशीला ऐकावी लागली शेरेबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्यांकाच्या या ट्विटवर पुन्हा त्या व्यक्तीने ट्विट केलं. ‘माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे दिव्यांका. चांगल्या चित्रपटात काम कर आणि ड्रग्स प्रकरणात अडकू नकोस. करण जोहरजवळ तर अजिबात जाऊ नकोस’, असा सल्ला त्या व्यक्तीने दिव्यांकाला दिला. न विचारता दिलेल्या या सल्ल्यावर दिव्यांकाने उत्तर देत लिहिलं, ‘ही गोष्ट खूप आवडली. मनापासून धन्यवाद. आजकाल सर्वजण दुसऱ्यांना चुकीचंच समजतात. कलाकार कितीही मजबूत दिसत असले तरी मन दुखावतंच. ज्या दिवशी वडिलांनी मला या शहरात सोडून भोपाळला निघून गेले, त्या दिवसापासून त्यांची मान अभिमानाने उंच राहावी हाच माझा प्रयत्न आहे. हा कमळ चिखलातही कमळच राहील.’