टेलिव्हिजन जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया यांच्या लग्नाची सर्व स्तरावर बरीच चर्चा झाली. सोशल मिडीयापासून ते माध्यमांमध्ये त्यांच्या शाही लग्नसोहळ्याबाबत चर्चा केली गेली. त्यांच्या लग्नातील फोटोंबाबत चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या प्रेमाखातर या जोडप्याने त्यांच्या लग्न सोहळ्यातील कॅमे-यात कैद केलेले काही क्षण शेअर केले होते. इंदूर येथे दिव्यांका आणि विवेकचा शाही लग्नसोहळा पार पडलेला. त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यासाठी चंदीगढमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आले होते.
आता लग्नानंतर दिव्यांका आणि विवेक आपापल्या कामात व्यस्त झाले आहेत. कामामुळे या जोडप्याला त्यांचा हनीमून पुढे ढकलावा लागला आहे. याचविषयी बोलताना दिव्यांकाने त्यांना होणा-या मुलांविषयी चर्चा केली. सध्या तरी या जोडप्याला मुलांची काहीच घाई नाही. पण एका प्रश्नाला उत्तर देताना दिव्यांका म्हणाली की, फ्रॅक्चर होऊनही मी काम करू शकते, स्लिप डिस्क होऊनही मी काम करू शकते. इतकेच नाही तर पोटात बाळाला घेऊनही मी काम करू शकते. असे नाही की, काम खूप असल्यामुळे मला सुट्टी हवीय. तर आम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत काही वेळ एकत्र घालवण्याची गरज आहे. केवळ त्याचसाठी मला हनीमूनला जाण्याची इच्छा आहे. यावर विवेक म्हणाला की, आधी आम्ही थोडं फिरून घेऊ, मग मुलांचा विचार करू.
दिव्यांका सध्या स्टार प्लस वाहिनीवरील ये हैं मोहब्बते मालिकेत व्यस्त आहे. तर विवेक दहिया हा कलर्स वाहिनीवरील कवच आणि ये हैं मोहब्बते मालिकांमध्ये काम करत आहे.