ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. सततच्या आजारपणांमुळे त्यांनी सार्वजनिक जीवनापासून दूर राहणेच पसंत केले होते. ६० आणि ७० च्या दशकातील सर्वात देखणा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. तेव्हाच्या प्रत्येक तरुणीच्या ओठी फक्त शशी कपूर यांचेच नाव असायचे. पण त्यांच्या हृदयावर फक्त एकीनेच राज्य केले ती म्हणजे ब्रिटिश अभिनेत्री जेनिफर केंडल. स्वतः शशी कपूर यांनी एका मुलाखतीत त्यांची प्रेम कहाणी कथन केली होती. त्यांच्या अजरामर प्रेम कहाणीला पुन्हा एकदा उजाळा देऊ…
“मी जेनिफरला १९५६ मध्ये पहिल्यांदा थिएटरमध्ये बसलेले पाहिले होते. तेव्हा जेनिफर माझे एक नाटक पाहायला आली होती. कलकत्त्यातील अॅम्पायर नावाच्या सभागृहात आम्ही नाटक सादर करत होते. तिथे आमचे नाटक चार आठवडे चालणार होते. त्याचदरम्यान आमच्यानंतर जेनिफरच्या शेक्सपियराना या कंपनीचा शोही लावण्यात आला होता. पण आमच्या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे हा अवधी अजून थोडा वाढवण्यात आला. पर्यायाने जेनिफर आणि तिच्या टीमलाही थांबावे लागणार होते. तिची टीम आमचे नाटक पाहायला अनेकदा यायची. मी नेहमीच तिला एका ठराविक जागीच बसलेली पाहायचो. त्यानंतर मला कळलं की ती शेक्सपियराना कंपनीचे मालक केंडल यांची मुलगी आहे.”
कपूर पुढे म्हणाले की, आमच्या ग्रुपमध्ये माझा चुलत भाऊ शुभीराजही होता. तो तेव्हा नावाजलेला टीव्ही कलाकार होता. मी त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो की, चल तिला जाऊन भेटूया… शुभीराजने तिची आणि माझी भेट घडवून देण्याचे वचन दिले होते. ठरल्याप्रमाणे जेनिफर आणि मी एम्पायर थिएटरच्या मागेच असलेल्या एका हॉटेलमध्ये भेटलो. तिला भेटण्याआधी माझी एकही गर्लफ्रेण्ड नव्हती. त्यामुळेच मी मनातून फार घाबरलेला होतो. तिला भेटायला जाण्याआधीच मला घाम फुटला होता… पण खरं सांगतो तेही काय दिवस होते. लोकांना ही गोष्ट खरीच वाटणार नाही. आम्ही त्या हॉटेलमध्ये भेटल्यावर शुभीराजने आमची ओळख करुन दिली. तिने मला पहिला प्रश्न विचारला की तू कोण आहेस? आमची पहिली भेट फार काही खास नसली तरी मी फार खूश होतो. पण हळूहळू तिचा ग्रुप मला त्यांची नाटकं पाहायला बोलवायला लागला आणि आमच्यात ओळख वाढू लागली. माझ्या आणि जेनिफरच्या प्रेमसंबंधांची चाहूल माझ्या मित्र-परिवाराला लागल्यावर साऱ्यांनीच आम्हाला चिडवायला सुरू केली. ‘शशीने अजून उडणं काय असतं हे पाहिलं ही नाही त्याआधीच त्याची पंख छाटली गेली,’ अशीच अनेकांची भावना होती.
१९८४ मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर एकटे राहायला लागले होते. त्यानंतर त्यांची तब्येत सातत्याने बिघडत गेली. सततच्या आजारपणामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणेच पसंत केले.