२००६ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटातील शाहरुख खान व प्रिती झिंटा यांचा लहान मुलगा आठवतोय? आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारा हा मुलगा प्रत्यक्षात मुलगा नसून एक मुलगी आहे. बालकलाकार म्हणून चित्रपटामध्ये मुलाचं काम केलेल्या या मुलीचं नाव अहसास चन्ना असं असून आज ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.
अहसास चन्नाचा जन्म जालंधरमध्ये झाला असून इक्बाल चन्ना पंजाबी हे चित्रपट निर्माते आहेत. तर तिची आई कुलबीर कौर या छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहेत. घरातूनच अभिनयाचा वारसा मिळालेल्या एहसासने ‘कभी अलविदा ना कहेना’ या चित्रपटामध्ये एका मुलाची भूमिका साकारली होती. एहसास चन्ना सध्या तरुणाईच्या गळ्यातलं ताईत झाली असून सोशल मीडियावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत. एहसास कलाविश्वामध्ये सक्रिय असून मालिका आणि वेब सिरीजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तिची ‘कोटा फॅक्ट्री’ ही सिरीज प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
एहसासने वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. ‘वास्तुशास्त्र’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने कलाविश्वामध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिला अभिनेत्री सुश्मिता सेनसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटामध्ये एहसासने केलेल्या अभिनयामुळे तिला लहान असतानाच अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. यावेळी तिने ‘फूंक’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘माय फ्रेंड गणेशा’ या चित्रपटामध्ये काम केलं होतं. विशेष म्हणजे ‘माय फ्रेंड गणेशा’ या चित्रपटामध्येही तिने एका मुलाची भूमिका साकारली होती.
दरम्यान, बालकलाकार ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या एहसासची ‘कसम’ या मालिकेतील भूमिका विशेष गाजली. या मालिकेव्यतिरिक्त तिने ‘देवों के देव…महादेव’ या मालिकेत भगवान शंकराच्या मुलीची अशोकासुंदरीची व्यक्तीरेखा साकारली होती. तसंच ‘मधुबाला-एक इश्क एक जुनून’, ‘क्राइम पट्रोल’, ‘गंगा’, ‘कोड रेड-तलाश’, ‘ओए जस्सी’, ‘एमटीवी फना’ या कार्यक्रमांमध्ये ती झळकली आहे.
