‘बबड्या’ हे नुसतं नाव जरी ऐकलं तरी अनेकांना आजकाल चीड येते. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत अभिनेता आशुतोष पत्कीने भूमिकाच तशी साकारली आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या मालिकेत निवेदिता सराफ, गिरीश ओक, आशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिका साकारत आहेत. मालिकेत आसावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नुकतीच करोनावर मात केली आणि पुन्हा एकदा त्या कामावर रुजू झाल्या आहेत. प्रेक्षकांना तर बबड्याचा राग येतोच पण त्यांच्याप्रमाणेच निवेदिता यांनाही बबड्याचा राग येतो का, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिला.

‘बीबीसी न्यूज मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत निवेदिता सराफ म्हणाल्या, “मला बबड्याचा थोडाथोडका नाही तर प्रचंड राग येतो. आसावरीने असं वागू नये असंही खूप वाटतं. पण तीच या भूमिकेची गंमत आहे. एखादी न पटणारी व्यक्तीरेखा पडद्यावर साकारणं हे कलाकारासाठी खरं आव्हान असतं.” यावेळी त्यांनी आसावरी आणि त्यांच्यात कोणती साम्यस्थळं आहेत, हेसुद्धा सांगितलं. “आसावरीप्रमाणेच मलाही स्वयंपाक करायला आणि इतरांना खाऊ घालायला फार आवडतं. ज्याप्रमाणे आसावरी कुटुंबाला प्राधान्य देते. तसंच मीसुद्धा करिअर आणि इतर गोष्टींपेक्षा माझ्या कुटुंबाला प्राधान्य देते”, असं त्या म्हणाल्या.

आणखी वाचा : ‘बबड्या’ हे नाव कसं सुचलं? तेजश्रीने सांगितली खरी गंमत

सेटवर जोरदार स्वागत

निवेदीता सराफ यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनावर यशस्वी मात करुन पुन्हा एकदा सेटवर येऊन शुटिंगला सुरुवात केली आहे. यावेळी सेटवरील इतर कलाकारांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.