लॉकडाउनमुळे बंद करण्यात आलेलं चित्रपट व मालिकांचं शूटिंग आता पुन्हा एकदा सुरु करण्यात आलं आहे. परिणामी आपापल्या गावी गेलेले अनेक कलाकार आता पुन्हा मुंबईत परतत आहेत. मात्र या प्रवासात सोशल डिस्टंसिंगचे नियम बिलकूल पाळले जात नाहीत, अशी तक्रार अभिनेत्री डोनल बिष्ट हिने केली आहे. डोनलने अलिकडेच दिल्ली ते मुंबई विमान प्रवास केला. मात्र या प्रवासात तिला बिलकूल सुरक्षित वाटलं नाही.

‘द सोचो प्रोजेक्ट’ या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगसाठी डोनल बिष्ट पुन्हा एकदा मुंबईत परतली आहे. मुंबईत येण्यासाठी तिने विमानातून प्रवास केला. मात्र या प्रवासात PPE किट्स अभावी ती स्वत:ला असुरक्षित समजत होती. इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक चकित करणारे खुलासे केले. ती म्हणाली, “मुंबईत येण्यासाठी मी ज्या विमानाचं तिकिट काढलं ते विमान रद्द झालं. त्यानंतर दुसऱ्या विमानाने मी प्रवास केला. हा अनुभव अत्यंत वाईट होता. विमानात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नव्हते. दोन प्रवाश्यांमध्ये एका सीटचं अंतर नव्हतं. शिवाय आम्हाला PPE किट्स देखील दिलं गेलं नाही. विमान कंपन्यांच्या या बेजबाबदारपणामुळे मला खूप असुरक्षित वाटत होतं.”

डोनल बिष्ट एक टीव्ही अभिनेत्री आहे. २०१४ साली ‘एअर लाईन्स’ या मालिकेतून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ‘कलश – एक विश्वास’, ‘एक दिवाना था’, ‘रूप – मर्द का नया स्वरूप’, ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकांमध्ये तिने काम केले. सध्या ती ‘द सोचो प्रोजेक्ट’ या वेब सीरिजमध्ये काम करत आहे. या सीरिजच्या चित्रीकरणासाठी ती मुंबईत परतली आहे.