समाधान..हुरहूर…आनंद..व्याकुळता…निर्माण होणारी एक अनामिक पोकळी आणि तरीही व्यापून उरणारं बरंच काही..अशा शब्दांत डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता लवकरच निरोप घेणार असल्याने अमोल कोल्हे भावूक झाले. यासोबतच त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात दिसत असून समुद्रकवड्यांच्या माळाला ते वंदन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘सुरु झालेला प्रवास कधी ना कधी संपणार हे निश्चितच असतं.काही प्रवास खूप काही शिकवून जातात. कर्तव्यपूर्तीची अनुभूती देतात, स्वप्नपूर्तीचा अनुभव देतात, जणूकाही आयुष्यभराची शिदोरी देतात. असाच एक प्रवास, काळजाच्या कप्प्यात जपून ठेवण्याजोगा…छत्रपती संभाजी महाराजांची अंगारगाथा.. स्वराज्यरक्षक संभाजी’, असे उद्गार या व्हिडीओत ऐकायला मिळतात.

झी मराठी वाहिनीवरील ही अत्यंत लोकप्रिय मालिका फेब्रुवारी महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले.