मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होत आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे पैलू चित्रपटातून उलगडत जाणार आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचा तो सोनेरी इतिहास पुन्हा या चित्रपटातून पाहता येणार आहे. या चित्रपटातलं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे पहिल्या गाण्यासाठी डॉ. काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या ‘हा खेळ सावल्यांचा’ चित्रपटातील ‘गोमू संगतीनं’ या गाण्याची निवड करण्यात आली आहे.
‘हा खेळ सावल्यांचा’ चित्रपटातील ‘गोमू संगतीनं’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. आजही या चित्रपटाची आणि त्यातल्या गाण्याची जादू रसिकांच्या मनावर कायम आहे. तिच जादू पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी या चित्रपटातून मिळणार आहे. सुबोध भावे या चित्रपटात डॉ. काशीनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. तर ‘गोमू संगतीनं’ या गाण्यासाठी आशा ताईंची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता माळीनं साकारली आहे. आशा ताईंचा सोज्वळ, शालीन चेहरा आणि हुबेहुबे त्यांच्यासारखे भाव व्यक्त करत प्राजक्तानंही तो काळ उत्तमरित्या साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
जुनं गाणं पुन्हा त्याच पद्धतीनं चित्रीत करण्यात आलं आहे, अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. ८ नोव्हेंबरला ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे सोबतच सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, सुमित राघवन असे अनेक बडे कलाकारही पाहायला मिळणार आहेत..