‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’, या गाण्याने २० वर्षांपूर्वी नाट्यरसिकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आजही सुखाची व्याख्या शोधताना प्रेक्षकांना हे गाणं आवर्जून आठवतं. ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकातून अभिनेता प्रशांत दामले यांनी नाट्यरसिकांना खळखळून हसवलं. आता २० वर्षांनंतर या गाण्याचं नवं रुप प्रशांत दामले आणि कविता मेढेकर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

एका लग्नाची गोष्ट या नाटकात लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरच्या गमतीजमती मांडण्यात आल्या होत्या. यातील गाण्यासोबतच प्रशांत दामले- कविता मेढेकर ही जोडीसुद्धा सुपरहिट ठरली होती. या नाटकाचा पुढचा भाग लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे.

श्रीरंग गोडबोले लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित हे नाटक १४ नोव्हेंबर रोजी रंगभूमीवर रसिकांच्या भेटीला येणार आहे. नाटकाच्या या पुढील भागाबद्दल सांगताना प्रशांत दामले म्हणाले, ‘१९९८ मध्ये हे नाटक पहिल्यांदा आलं. नाटकातल्या मन्या आणि मनीचं लग्न तेव्हा अगदी नवीन होतं. आता लग्न होऊन इतकी वर्षी झाली आहेत. लग्नात एक साचलेपण आलं आहे. कुटुंब वाढलं आहे. त्यातल्या गमतीजमती या नव्या नाटकात पाहायला मिळणार आहेत.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाट्यरसिक ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नव्याने बघू शकणार आहेत. कारण यात आधीचे संदर्भ असले तरी कथा नवीच आहे. त्यामुळे ही एका लग्नाची पुढची गोष्ट जरी असली तरी पहिली गोष्ट माहीत असण्याची गरज नाही, असं कविता मेढेकर सांगतात. त्याचप्रमाणे आजच्या पिढीशी या नाटकाची कथा संबंधित असल्याने तरुण वर्गालाही ती आवडेल असा विश्वास दोघांनी व्यक्त केला आहे. मुख्य म्हणजे यामध्ये प्रशांत यांच्या गाण्यांची मेजवानी रसिकांना पुन्हा एकदा मिळणार आहे.