एकता कपूरने टेलिव्हिजन विश्वात स्वत:चे निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र, हा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीला तीसुद्धा बऱ्याच नकारांना सामोरी गेली होती. त्यावेळी कोणत्याच चॅनलचे मालक तिला भेटण्यासाठी किंवा तिच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक नव्हते. शाहरुख खानच्या ‘टेड टॉक्स इंडिया’ या कार्यक्रमात तिने याबद्दलचा अनुभव प्रेक्षकांना सांगितला.
विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती या कार्यक्रमात आपले अनुभव आणि सकारात्मक विचार मांडत असतात. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी सांगताना एकता म्हणाली, ‘सर्व काही ठीक चाललं होतं. पण करिअरसाठी माझ्याकडे काही विशेष प्लॅन नव्हता. टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये व्यवसाय करण्याचा मी निर्णय घेतला. वडिलांनीही खूप मदत केली. गुंतवणुकीसाठी पैसेही दिले. पण सुरुवात माझ्यासाठी सहजसोपी नव्हती. माझे कित्येक प्रोजेक्ट्स चॅनेल्सच्या मालकांनी नाकारल्या. इतकंच नाही, तर एक वेळ अशी आली की कोणत्याच चॅनेलचा मालक मला भेटायला तयार नव्हता. काहींनी तर पैसे गुंतवल्यामुळे माझ्या वडिलांनाही सुनावलं होतं. तुमच्या मुलीचे छंद पूर्ण करण्यासाठी तुम्ही पैसे का वाया घालवत आहात, असाही प्रश्न त्यांना एकाने विचारलेला.’ या अपयशाने एकता काही काळासाठी खचली होती पण तिने हा प्रवास थांबवला नाही.
वाचा : ‘टायगर जिंदा है’ची ३०० कोटींची झेप!
‘बालाजी टेलिफिल्म्स लि.’ या बॅनरअंतर्गत एकताने बऱ्याच लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली. म्हणूनच तिला ‘टेलिव्हिजन क्वीन’देखील म्हटलं जातं. टेड टॉक्समधील एकताचा हा एपिसोड रविवारी ‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.