सुपरस्टार गायक एल्विस प्रेस्ली यांचा नातू गायक बेंजामिन केओफ याने आत्महत्या केली आहे. तो केवळ २७ वर्षांचा होता. टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी १२ जुलै रोजी राहत्या घरी त्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळलेलं नाही.
बेंजामिनची आई गायक लिसा मेरी यांचे मॅनेजर रॉजर विडिनोवस्की यांनी त्याच्या मृत्यूची बातमी दिली. बेंजामिनच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबियांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. लिसा मेरी यांना धक्का सहन न झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अशी माहिती विडिनोवस्की यांनी दिली.
बेंजामिन केओफ एल्विस प्रेस्ली यांचा एकमेव नातू होता. तो आपल्या आजोबांसारखाच दिसायचा. त्यामुळे अनेक जण त्याला ज्युनिअर एल्विस प्रेस्ली म्हणायचे. बेंजामिन देखील आपल्या आजोबांप्रमाणे एक उत्तम गायक होता. अलिकडेच त्याने एका व्हिडीओ अल्बमसाठी युनिव्हर्सल स्टुडिओसोबत पाच दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा करार केला होता. परंतु हा अल्बम प्रदर्शित होण्याआधीच त्याने आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.