‘एनटँगल्ड – द कन्फ्यूजन’ हा चित्रपट कोस्टारिकात लोकप्रिय

पाटण्यात जन्मलेला प्रभाकर शरण हा सध्या लॅटिन अमेरिकेतील सुपरहीट अभिनेता ठरला असून त्याचा एनरेडाडोस-ला कन्फ्यूजन (एनटँगल्ड – द कन्फ्यूजन) हा चित्रपट कोस्टारिकात लोकप्रिय ठरला आहे. बॉलिवूड पद्धतीने बनवलेला हा पहिलाच लॅटिन अमेरिकी चित्रपट असून तो कोस्टारिका, मुंबई, पनामा येथे चित्रित करण्यात आला आहे.

प्रभाकर याने नॅन्सी डॉबल्स हिच्याबरोबर प्रमुख भूमिका केली असून आता मार्च एप्रिलमध्ये त्याचा ‘एक चोर दो मस्तीखोर’ हा चित्रपट इंग्रजी, हिंदी व  भोजपुरी या तीन भाषांतून येत आहे. नॅन्सी डॉबल्स ही कोस्टारिका दूरचित्रवाणीवरची कार्यक्रम सादरकर्ती व अभिनेत्री आहे. त्याच चित्रपटाची आवृत्ती असलेल्या ‘एक चोर दो मस्तीखोर’ मध्ये हॉलिवूड अभिनेता स्कॉट स्टेनर हा प्रमुख भूमिकेत असून तो चित्रपट कोस्टारिका येथील पॅसिफिक इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन तयार करीत आहे. या चित्रपटात मारियो चॅकॉन, जोस कॅस्ट्रो हे स्थानिक अभिनेते आहेत. एनरेडाडोस- ला कन्फ्यूजन हा चित्रपट गेल्या फेब्रुवारीत प्रसारित झाला असून कोस्टारिका, पनामा, निकाराग्वा, होंडुराज, ग्वाटेमाला, सान साल्वादोर येथे तो तिकीटबारीवर खूपच यशस्वी ठरला. सिनेपोलीस कंपनी आता तो लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांत तसेच अमेरिकेत तो मार्च एप्रिलमध्ये प्रसारित करणार आहे.

खिलाडी ७८६ या चित्रपटात गाजलेला आशिष मोहन याने सुरुवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शन केले पण नंतर प्रभाकर याने स्वत:च उरलेले दिग्दर्शन पूर्ण केले. कारण मोहन व त्याच्यात मतभेद झाले होते. भारत व लॅटिन अमेरिका यांना जोडणारा हा चित्रपट असल्याचे प्रभाकर याने सांगितले. कोस्टारिकाचे चित्रपट आयुक्त जोस कॅस्ट्रो यांनी सांगितले की, कोस्टारिकात अशा पद्धतीचा चित्रपट प्रथमच तयार केला आहे. लॅटिन चित्रपट जगतात तो मैलाचा दगड असून त्याची शैली वेगळी आहे. प्रभाकर हा अभ्यासाच्या निमित्ताने २००० मध्ये कोस्टारिकात आला व त्यानंतर त्याने भारतीय कपडे व रेस्टॉरंटचा उद्योग तेथे सुरू केला. नंतर २००६ पासून त्याने कोस्टारिकात भारतीय चित्रपट आणले. त्यात त्याला यश आले नाही. नंतर तो २०१० ते २०१३ दरम्यान पुन्हा भारतात होता. त्यावेळी त्याला पत्नीने घटस्फोट दिला.

२०१४ मध्ये तो परत कोस्टारिकात गेला व तिथे भारतीय चित्रपट सुरू केले त्यावेळी त्याची भेट शिक्षणतज्ज्ञ तेरेसा रॉड्रिग्यूज यांच्याशी झाली. त्यांनी त्याचे स्वप्न साकार केले व १५ लाख डॉलर्स उभे करण्यास मदत केली. नंतर तो यशस्वी उद्योगपती बनला पण चित्रपटाची आवड कमी झालेली नव्हती. त्यामुळे त्याने चित्रपटनिर्मिती केली. आता तो बॉर्डर्स विदाऊट लाइफ हा चित्रपट तयार करीत असून बेकायदेशीररीत्या अमेरिकेत आलेल्यांच्या जीवनावर तो आधारित आहे. त्याचे आईवडील प्रभुनाथ शरण व सुभद्रा शरण हे मोतीहारीतील निवृत्त बँक कर्मचारी आहेत. त्याचा जन्म पाटण्यात झाला व शिक्षण भुरकुंडा तसेच रामनगर या सध्या झारखंडमध्ये असलेल्या गावात झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षण रोहतक येथे झाल्यानंतर तो कोस्टारिकाला गेला.