तरुणाईच्या गळ्यातील ताईत अभिनेता प्रभासचा आज वाढदिवस आहे. दरवर्षी वाढदिवशी प्रभास चाहत्यांना काही ना काही सरप्राइज भेट देतच असतो. गेल्या वर्षी त्याने त्याच्या आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ‘साहो’ चित्रपटाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. त्यानंतर आज प्रभासने त्याच्या या चित्रपटाचा एक व्हिडिओ चाहत्यांसमोर आणला आहे. ‘साहो’च्या पडद्यामागील दृश्यांचा हा व्हिडिओ आहे. पण यातील प्रभासचा लूक पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल!

चित्रपटाची जवळपास ४०० लोकांची टीम गेल्या काही महिन्यांपासून अबू धाबी इथं शूटिंग करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अबू धाबीमधल्या शूटिंगचे काही दृश्य प्रभासच्या चाहत्यांसाठी व्हिडिओच्या मार्फत प्रदर्शित करण्यात आले आहेत. या व्हिडिओत अॅक्शन कोरिओग्राफर केवीन बेट्स, श्रद्धा कपूर आणि प्रभास यांची झलक पाहायला मिळत आहे.

प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या ‘साहो’ चित्रपटाचा बजेट जवळपास ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ इतकाच आहे. निर्मात्यांनी या चित्रपटासाठी खूप पैसा खर्च केला असून त्याचा प्रत्यय व्हिडिओतून येत आहे. बाहुबलीच्या अभूतपूर्व यशानंतर प्रभासच्या कामगिरीवर साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले असेल, याची जाणीव साहोचा दिग्दर्शक सुजीथला पूर्णपणे आहे. त्यामुळेच या सिनेमात कोणतीही उणीव राहू नये, याची पूर्ण काळजी तो घेत आहे. प्रभास, श्रद्धाव्यतिरिक्त या बिग बजेट चित्रपटात जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर, अरुण विजय, मुरली शर्मा यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader