पहलाज निहलानी यांचा केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यक्षपदाचा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला होता. त्यांच्या आडमुठ्या आणि वादग्रस्त मार्गदर्शक तत्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले होते. म्हणूनच अध्यक्षपदावरुन त्यांची उचलबांगडी केल्यानंतर अनेकांनी दिलासा व्यक्त केला. आपल्याविरुद्ध झालेल्या लॉबिंगमुळेच आपली उचलबांगडी करण्यात आली, असं मत निहलानी यांनी व्यक्त केलं.

‘माझ्या उचलबांगडीनंतरही सीबीएफसीचं काम पूर्वीसारखंच सुरु आहे. मार्गदर्शक तत्त्वं तीच असल्याने आताही चित्रपटांतील दृष्यांवर कात्री चालवली जाते. सीबीएफसी आता किती कट्स सांगते त्यावर कोणताच गाजावाजा केला जात नाही. आता सेन्सॉर बोर्डाला ‘संस्कारी’ म्हटलं जात नाही,’ असं निहलानी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. अध्यक्षपदावरुन मला हटवलं जावं अशी काही लोकांची इच्छा होती, असंही ते पुढे म्हणाले.

वाचा : आदित्य पांचोली आणि झरीना वहाबने कंगनाला पाठवली मानहानीची नोटीस

गेल्या महिन्यात निहलानी यांच्या जागी प्रसिद्ध गीतकार आणि अॅडमेकर प्रसून जोशी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. प्रसून जोशी यांच्या अध्यक्षपदाखाली फ्रेडा पिंटो आणि रिचा चड्ढा यांच्या ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटात ४५ कट्स, वरुण धवनच्या ‘जुडवा २’मध्ये पाच कट्स तर कंगनाच्या ‘सिमरन’ चित्रपटात दहा कट्स सांगण्यात आले.

Vogue Women of the Year Awards 2017: बी-टाऊनच्या सेलिब्रिटींचा तुम्ही न पाहिलेला खास अंदाज

‘मी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावर येण्यापूर्वी भ्रष्टाचार, प्रमाणपत्र देण्यात दिरंगाई करणे, इंग्रजी आणि डब केलेल्या चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अनेक समस्या आणि वाद होते. मात्र या समस्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न केले,’ असंही निहलानी म्हणाले.