आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचं आत्मचरित्र चांगलंच चर्चेत आहे. ‘अॅन ऑर्डिनरी लाइफ’ या आत्मचरित्रात नवाजने आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय. यावरून बरेच वादविवाददेखील झाले. आधी नवाजुद्दीन त्याचे पुस्तक विकण्यासाठी, त्याचा खप वाढवण्यासाठी एका महिलेचे शोषण करत आहे, तिचा अपमान करत आहे, असे मत मांडत अभिनेत्री निहारिका सिंगने त्याच्यावर टीका केली. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने त्याच्यावर निशाणा साधला आहे. अभिनेत्री सुनीता राजवारने यासाठी फेसबुकवर एक भलीमोठी पोस्टच लिहिली आहे.

सुनीता पूर्वाश्रमीची प्रेयसी असल्याचं नवाजने आत्मचरित्रात स्पष्ट केलंय. मुंबईत आल्यानंतर कशाप्रकारे तो सुनीताच्या प्रेमात पडला आणि एके दिवशी तिने त्याची साथ सोडली, हे सर्व त्यात मांडलं. तर सुनीताने नवाजवर खोटं बोलल्याचा आरोप फेसबुक पोस्टमध्ये केलाय. त्याच्यासोबत ब्रेकअप करण्यामागचं नेमकं कारण सांगत तिने लिहिलं की, ‘तुझ्या फोनला उत्तर देणं मी टाळत होते, कारण मला तुझी घृणा वाटायची. तुझे विचार पाहून तुझ्याशी बोलायची इच्छाच व्हायची नाही.’

रंग-रूप, आर्थिक परिस्थिती तर कधी वॉचमनची नोकरी करत असल्याचं सांगून नवाजुद्दीन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असे, असं ती म्हणते. गरीब असल्याने सुनीताने ब्रेकअप केल्याचं नवाजने आत्मचरित्रात लिहिलं. मात्र, याउलट तिने लिहिलं की, ‘तो स्ट्रगलर आणि गरीब होता म्हणून मी त्याला सोडलं, असं तो म्हणतो. मी तरी कुठे श्रीमंत होते. तुझ्याहून अधिक गरीब तर मी होते. कमीत कमी तू स्वत:च्या घरी राहत होतास. मी मैत्रिणींच्या घरी राहून कामासाठी संघर्ष करत होती.’

वाचा : …अन् सोना मोहपात्राने विद्याला सुनावले खडे बोल

ब्रेकअपचं खरं कारण सांगत सुनीताने पुढे म्हटलं की, ‘आपल्या नात्याबद्दल मस्करी करत खासगी गोष्टी तू आपल्या कॉमन फ्रेण्ड्सना सांगायचा, म्हणूनच मी तुला सोडलं. महिला आणि प्रेम यांविषयी तू काय विचार करतोस, हे मला समजलं होतं. मी गरिबीमुळे नाही तर तुझ्या गरीब विचारांमुळे तुला सोडलं. आत्मचरित्रातून आज तू हे स्पष्ट केलंस की ज्या नवाजला मी ओळखायचे, तू त्याहूनही अधिक गरीब झाला आहेस. तू तेव्हासुद्धा महिलांचा आदर करायचा नाहीस आणि आतासुद्धा आदर करायला शिकला नाहीस.’

सुनीला राजवारने ‘मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूं’, ‘एक चालिस की लास्ट लोकस’, ‘संकट सिटी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘शगुन’, ‘रामायण’, ‘हिटलर दीदी’, ‘संतोषी माता’ यांसारख्या मालिकांमध्येही ती झळकली.

Story img Loader