मराठी चित्रपटांचा उंचावता आलेख गेल्या बऱ्याच वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. विविध कथानकांना न्याय देणाऱ्या या चित्रपटांमध्ये आता आणखी एका चित्रपटाच्या नावाचा सामावेश झाला आहे. त्या चित्रपटाचं नाव म्हणजे ‘भेटली तू पुन्हा’. पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच निमित्ताने या दोन्ही कलाकारांनी ‘लोकसत्ता लाइव्ह चॅट’ला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी बऱ्याच प्रश्नांना उत्तरं दिली. प्रेक्षकांच्या प्रश्नांमध्येच त्यांनी सेन्सॉरच्या भूमिकेविषयी आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावरही मतं मांडली.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीत ‘नेपोटिझम’ म्हणजेच घराणेशाहीच्या वादावरुन बऱ्याच चर्चा सुरु आहेत. यासंबंधीचाच प्रश्न विचारला असता पूजाने त्याविषयी तटस्थ भूमिका घेतली. तर वैभवने हा मुद्दा त्याच्या दृष्टीने स्पष्ट करुन सांगितला. ‘नेपोटिझम’ विषयी आपलं मत मांडताना वैभव म्हणाला, ‘मी या गोष्टीकडे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन दृष्टीकोनांतून पाहतो. पुढे मागे जाऊन माझं लग्न झालं आणि समजा माझ्या मुलाला या कला क्षेत्रात यायचं असेल, तर मी माझ्या मुलांना नक्कीच पाठिंबा देईन. ही एक नैसर्गिक बाब आहे, त्यात वावगं काहीच नाही. पण, कोणाला मागे टाकण्यासाठी किंवा बाहेरुन आलेल्या कोणा एका व्यक्तीला मागे खेचण्यासाठी घराणेशाहीचा वापर करु नये.’

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

‘लोकसत्ता लाइव्ह चॅट’च्या निमित्ताने या दोन्ही कलाकारांनी चौफेर चर्चा केली. त्यासोबतच चाहत्यांच्या प्रश्नांना उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. यावेळी रोजच्या रटाळ मालिकांविषयीच्या मतांपासून ते अगदी हटके चाहत्यांच्या अनुभवही या कलाकारांनी शेअर केला. वैभव आणि पूजाचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. याचं खरं श्रेय वैभवने आपल्या चाहत्यांना दिलं. ‘प्रेक्षकांचं प्रेम पाहून मी भारावतो’, असं म्हणत त्याने सोशल मीडियावर फॅन क्लब चालवणाऱ्या युझर्सचेसुद्धा आभार मानले. ‘आम्ही आमचं काम करतोय, वेगळं असं काहीच नाही. पण, प्रेक्षकांकडून मिळणारी खास वागणूक हा काही आम्हा कलाकारांचा हक्क नाही तर ते आमचं भाग्यच आहे’, असं म्हणत एक कलाकार म्हणून आपल्या वाट्याला आलेल्या सुखाविषयी आणि वेगळ्या अनुभवाविषयी वैभवने प्रेक्षकांचे आभार मानले.