आपल्या मादक अंदाजासाठी आणि सोशल मीडियावरील पोस्टसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या एका वेगळ्याच पेचात सापडली आहे. बुधवारी तिने वांद्रे पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी उर्वशीच्या नावे असणाऱ्या बनावट आधार कार्डचा वापर करण्यात आल्याचं प्रकरण या तक्रारीमुळे उघड झालं आहे.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उर्वशी त्या हॉटेलमध्ये गेली होती, तेव्हाच हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने तिच्या नावे रूम बुक करण्यात आल्याची माहिती तिला दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने उर्वशीला तिच्या नावे रूम बुक करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर तिने लगेचच आपल्या सेक्रेटरीकडे अशी कोणतीही बुकींग करण्यात आली आहे का, अशी विचारणा केली. पण, असं काहीच बुकींग झालं नसल्याची माहिती तिला मिळाली. त्यावेळीच कोणीतरी आधार कार्डवरील आपला फोटो आणि नावाचा दुरुपयोग करत हॉटेलमध्ये बुकींग केल्याचं प्रकरण तिच्या लक्षात आलं. पण, ते आधार कार्ड आपलं नसल्याचं तिने स्पष्ट केलं.

वाचा : राधिका आपटेला का करावा लागला फोन सेक्स?

उर्वशीसोबत झालेल्या या सर्व प्रकरणी वांद्रे पोलिसांनी कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी पोलीस तपास करत असून, कोणत्या ठिकाणाहून उर्वशीच्या नावे हॉटेल रूमची बुकींग करण्यात आली याचा तपास केला जात आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे आणि वैयक्तिक माहितीविषयी गोपनीयता पाळली जात असूनसुद्धा अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचं लक्षात येत आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणाही कसोशीने प्रयत्न करत आहेत.